एवढ्या पैशांचं आम्ही काय करु! IT कंपनीने जाहीर केलं वर्षाला 2.5 लाखांचं पॅकेज

0
57

१४ ऑगस्ट (पीसीबी) – आयटी क्षेत्रातील 30 वर्षं जुनी कंपनी कॉग्निझंट सध्या आपल्या ऑफ कॅम्पस प्लेसमेंटमुळे चर्चेत आहे. कंपनीने ऑफर केलेलं पॅकेज पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ही कंपनी 1994 मध्ये चेन्नईत स्थापन करण्यात आली. कंपनीचे जगभरात 3.4 लाख कर्मचारी आहेत. ही कंपनी नियमितपणे Fortune 500 मध्ये स्थान मिळवते. मात्र भविष्याचा पाया रचणाऱ्या इंजिनिअर्सना कंपनी मूठभर पगार देत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. 

रिपोर्टनुसार, कंपनीने नव्याने नियुक्ती होणाऱ्या कर्मचाऱ्यांना वर्षाला 2.5 लाखांचं पॅकेज ऑफर केलं आहे. विशेष म्हणजे 2002 मध्येही त्यांनी हेच पॅकेज ऑफर केलं होतं. सध्या कंपन्यांमध्ये सुरु असलेली कपात आणि एआयमुळे नोकरीवर आलेली गदा यामुळे तरुणही सध्या जी ऑफर मिळत आहे ती स्विकारत आहेत. मात्र कंपनीच्या या पॅकेजवरुन नेटकरी नाराज झाले असून टीका करत आहेत.सध्याची पिढी रिल्स करण्यात आणि युट्यूबर होण्यात जास्त रस दाखवत आहे याचं आश्चर्य वाटत नाही असं एकाने म्हटलं आहे. तर एकाने लोक यापेक्षा शिकवणी घेत जास्त कमावतात असा टोला लगावला आहे.

एका युजरने 30 मिनिटं घरकाम करणाऱ्या महिला कशाप्रकारे 8 ते 10 घरांमध्ये काम करत यापेक्षा जास्त कमावतात हे सांगितलं आहे. या महिला इंजिनिअर्सपेक्षा जास्त पैसे कमावतात अशी खंत त्याने व्यक्त केली आहे. तर एकाने रस्त्याशेजारी ठेला लगावणारे जास्त कमावतात असं म्हटलं आहे.