एवढे अकार्यक्षम मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधीच पाहिले नाहीत; आदित्य ठाकरेंचा शिंदेंना टोला

0
76

मुंबई, दि. २६ (पीसीबी) : काल एका कॉनक्लेव्हमध्ये घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणाले की पुढल्या एक दोन वर्षांत मुंबई पॉटहोल मुक्त करू, पण ही तर त्यांची जुनीच टेप आहे. जवळपास अडीच वर्षांपासून त्यांचं हे घटनाबाह्य सरकार सत्तेवर आहे, गेल्या वर्षीचा किंवा या वर्षीचा रास्ता घोटाळा असेल, दोन्ही आम्ही एक्स्पोज केलं. पण अजूनही रस्ते खोदून ठेवले आहेत,अर्धा किलोमीटर देखील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचं काम झालेलं नाही असे सांगत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी अनेक मुद्यांवरून सरकारवर निशाणा साधला. एवढे अकार्यक्षम मुख्यमंत्री महाराष्ट्राने कधीच पाहिले नाहीत अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र सोडलं.

काल संध्याकाळापासून महाराष्ट्रात, मुंबईत जोरदार पाऊस झाला. काही मिनिटांच्या पावसात राज्यात, मुंबईतही अनेक भागांत पाणी साचलं,लोकांचे हाल झाले. मुंबई असो किंवा ठाणे, पुणे या शहरांकडे लक्ष देण्यासाठी कोणीही नाहीये,तेथे वॉर्ड ऑफिसर नेमलेले नाहीत. मुंबई अक्षरश: ठप्प झाली. अनेक ठिकाणी ट्राफिक कोंडी झाली, रेल्वेतूम प्रवास करणाऱ्यांचे हाल झाले, एवढं भयानक चित्र मुंबईने कधीच पाहिलं नाही.

काल पालिकेचा एकही अधिकारी दिसला का? पोलिस यंत्रणा कुठे होती माहीत नाही, पालक मंत्री कुठे होते, वेस्टन एक्सप्रेस हायवे पाण्याने कसा भरला ? असे प्रश्न विचारत आदित्य ठाकरेंनी टीकास्त्र सोडलं.

कॉन्ट्रॅक्टर, पैसे आणि खोके एवढीच या सरकारची , राजवटीची पहिल्यापासून प्रायॉरिटी होती, अशी टीका त्यांनी केली. 15 वॉर्ड ऑफीसर नेमायला, तुम्हाला एवढी वर्ष का लागतात,असा सवालही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

गेल्या दोन वर्षांत आमचा महाराष्ट्र, पुणे, मुंबई लुटली. नॅशनल हायवे असोत की गल्लीतले रस्ते ते बेकार केलेत. तुमचं फुटीचं राजकारण आमच्यावर लादलं. पक्ष फोडायचे, कुटुंब तोडायचं,धर्मा-धर्मांत वाद निर्माण करायचा हे सगळं करून जी राजवट ली, ती काल दिसली. अर्ध्या तासाच्या पावसात मुंबई, ठाणं , पुणे भरलं ? पाणी सगळीकडे तुंबलं. हे पहिल्यांदा झालेलं नाही, पुण्यात ऑगस्टमध्ये दोनदा पूर येऊन गेला, काल तिसऱ्यांदा ही परिस्थिती उद्भवली. यावर कोणीच कसं बोललं नाही ?

आमच्यावर आरोप करणारे, आमचा पक्ष फोडणारे, टीका करणारे, यापैकी कोणी तरी राजकीय व्यक्ती, भाजप किंवा मिंधे गटाचा एकतरी राजकीय नेता काल समोर येऊन उत्तर देत होता का असा सवाल विचारत त्यांनी भाजप, शिंदे गटावर घणाघाती टीका केली.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी ठरवत 15 दिवसांच्या कैदेची शिक्षा आणि 25 हजार रुपयांचा दंडही ठोठावला. याबद्दल आदित्य ठाकरे यांना प्रश्न विचारण्यात आला. ‘ ते (संजय राऊत) कशालाही घाबरत नाहीत. ते त्यांचं उत्तर देतील. ते स्वतः लढत आहेत’ असे आदित्य ठाकरे म्हणाले.