एवढं करून कोणाची मस्ती असेल, तर पोलिसी खाक्या दाखवून…

0
311

पुणे, दि. ९ (पीसीबी) – पुण्यातील कोथरूडच्या सुतारदरा परिसरात कुख्यात गुंड शरद मोहोळवर ५ जानेवारी २०२४ रोजी दुपारच्या सुमारास चार जणांनी गोळ्या झाडून खून केल्याची घटना घडल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली होती. या घटनेतील आरोपींना काही तासांत जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले होते. मात्र आगामी काळात शहरात टोळी युद्ध होऊ नये या पार्श्वभूमीवर नवनियुक्त पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार शहरातील जवळपास २६७ हून अधिक गुंडाच्या टोळी प्रमुखांना चार दिवसांपूर्वी पोलीस आयुक्त कार्यालयात बोलावून आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. यामध्ये गुंड गजानन मारणे, निलेश घायवळ हे देखील उपस्थित होते. तर या गुंड निलेश घायवळ याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत मुंबईत फोटो काढला होता आणि मंत्रालय परिसरात रिल्स देखील तयार केली होती. हे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होते. यावरून विरोधकानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एकच टीका करण्यास सुरुवात केली होती.

शहरात कोणत्याही गुन्हेगारीच्या घटनेला प्रोत्साहन देणे किंवा सहभागी झाल्यास, तुमच्यावर थेट कारवाई केली जाईल. तसेच सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारचे रिल्स किंवा मेसेज करु नयेत, हे सर्वांनी लक्षात ठेवावे. अशा शब्दांत गुन्हेगारांना पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दम भरला होता. पण त्यानंतर अगदी काही तासांत गुंड निलेश घायवळ याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या प्रकरणी निलेश घायवळवर पुणे पोलीस काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.

त्याच दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे पुणे दौर्‍यावर आले होते. त्यावेळी गुंड निलेश घायवळ याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, एवढं करून पुन्हा जर कोणाची मस्ती असेल, तर ती मस्ती पोलिसी खाक्या दाखवून नियंत्रणात आणावी लागेल. त्यातून नागरिकांच्या मनातून भीती गेली पाहिजे, या दृष्टीने पोलिस विभागाकडून नियोजन केले पाहिजे, अशी भूमिका मांडत पुणे पोलिसांना त्यांनी सूचना देखील केल्या.