एलआयसीच्या शेअर दरात चार टक्क्यांची घसरण, 700 रुपयांखाली शेअर दर पोहचला

0
304

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या एलआयसीच्या गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. एलआयसीच्या शेअर दरात सातत्याने सुरू असलेली घसरण आजही कायम राहिली. एलआयसीच्या शेअर दराने आतापर्यंतचा नीचांकी दर गाठला आहे. एलआयसीच्या शेअर दरात चार टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली असून 700 रुपयांखाली शेअर दर पोहचला आहे.

शेअर बाजारात सुरू असलेल्या घसरणीने चिंतेत असलेल्या गुंतवणूकदारांची चिंता एलआयसीने पुन्हा एकदा वाढवली आहे. एलआयसीने आज 680 रुपयांचा नीचांकी दर गाठला. सकाळी 10.55 वाजण्याच्या सुमारास 680.55 रुपयांवर एलआयसीचा शेअर व्यवहार करत होता. आयपीओ किंमतीच्या तुलनेत 27.50 टक्क्यांची घसरण झाली असून गुंतवणूकदारांना प्रति शेअर 260 रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे.

एलआयसीच्या शेअर दरात घसरण का?
ॲंकर इन्व्हेस्टर्ससाठी असलेला लॉक-इन कालावधी आज, 13 जून रोजी संपला आहे. एलआयसीच्या शेअरमध्ये होत असलेल्या पडझडीमुळे लॉक-इन कालावधी संपताच ॲंकर इन्व्हेस्टर्सकडे आपले शेअर्स विकण्याचा पर्याय आहे. शेअर्सच्या किमती घसरल्याने हे ॲंकर इन्व्हेस्टर्सही मोठ्या तोट्यात आहेत.ॲंकर इन्व्हेस्टर्सने त्यांच्याकडील शेअर्स विक्री सुरू करू शकतात. याच दबावातून शेअर विक्री सुरू असल्याचे म्हटले जात आहे.

गुंतवणूकदारांना 1.64 लाख कोटींचे नुकसान
आयपीओमधून गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. किरकोळ गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. एलआयसीचे बाजार भांडवल 4.34 लाख कोटींहून अधिक झाले आहे. आयपीओनुसार, एलआयसीचे बाजार भांडवल हे 6 लाख कोटींहून अधिक होते. शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांना 1.64 लाख कोटींचे नुकसान झाले आहे.

एलआयसीचे साडे तीन टक्के समभाग विक्रीसाठी सरकारनं काढले होते. मात्र, गुंतवणुकदारांना हवा तसा फायदा झाला नाही. दुसरीकडे, निर्गुंतवणुकीतून पैसे उभे करण्याचा मोदी सरकारचा मानस आहे. मात्र, युक्रेन-रशिया युद्धामुळे असलेली अस्थिरता आणि कोव्हिड परिस्थितीमुळे यात मोठ्या अडचणी येत आहेत. बीपीसीएल आणि आयडीबीआयसारख्या बॅंकांमधून सरकार पैसा उभा करु पाहतेय. मात्र, सरकारी एलआयसीचे उदाहरण बघता पुढील वाट बिकट असल्याचे दिसते.

दरम्यान, आज शेअर बाजार मोठी घसरण झाली आहे. शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स 1000 अंकांनी गडगडला. सेन्सेक्स आणि निफ्टी मोठी घसरण झाली आहे. जागतिक शेअर बाजारात सुरू असलेल्या पडझडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर झाला असल्याचे दिसून आले.