एमबीए च्या विद्यार्थ्यांनी साधला जिल्हा परिषद शाळेतील मुलांशी संवाद

0
176

पिंपरी : दि. २५ (पीसीबी)- पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील मु. पो. रांजणे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेला चिंचवड येथील यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट सायन्स (आयआयएमएस) च्या एमबीए विद्याशाखेतील विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी सदिच्छा भेट देत शाळेतील मुलांशी संवाद साधला.निमित्त होते या जिल्हा परिषद शाळेला नुकताच पुणे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष चषक आदर्श शाळा पुरस्कार 2023 मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्याचे.शाळेचे आदर्श शिक्षक दीपक खवले सर यांनी सर्वांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.

गेल्या चार वर्षांपासून आयआयएमएस चे विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग सातत्याने या शाळेला भेट देत असून या शाळेत आयआयएमएसच्या वतीने अनेकविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. ज्यामध्ये प्रामुख्याने नेतृत्वकला, संगणक कौशल्य प्रशिक्षण व चित्रकला व सामान्य ज्ञान इत्यादी उपक्रमांचा समावेश आहे. या सदिच्छा भेटी दरम्यान जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी स्वातंत्र्यसैनिकांनाद्दल मनोगत व्यक्त केले तसेच प्रदूषण नियंत्रण या विषयावर पथनाट्य देखील सादर केले. तसेच या शाळकरी विद्यार्थ्यांनी एमबीएच्या विद्यार्थ्यांसमवेत खो- खो खेळण्याचा आनंद घेतला.

‘यशस्वी’ संस्थेच्या आयआयएमएसने चार वर्ष केलेल्या सहकार्यामुळे,मार्गदर्शनामुळे शाळेला आदर्श शाळा पुरस्करापर्यंतची वाटचाल करता आली,असे मत या वेळी जिल्हा परिषद शाळेच्या केंद्र प्रमुख राजश्री गावडे मॅडम आणि मुख्याध्यापक सविता जैन मॅडम यांनी व्यक्त केले.शाळेतील तेजश्री पाटील मॅडम यांनी यशस्वी संस्थेच्या सर्व प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे आभार मानले.तर या जिल्हा परिषद शाळेसोबत काम करणाची संधी मिळाल्याने आमच्या विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांनाही खुप आनंद व समाधान प्राप्त झाला असून भविष्यातही या शाळेसोबत व विविध उपक्रम राबविण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे,असे आयआयएमएस चे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांनी आपल्या मनोगतात सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत प्रा.महेश महांकाळ,डॉ.पुष्पराज वाघ, डॉ.सचिन मिसाळ, प्रा.गंगाधर डुकरे यांच्यासह एमबीए चे विद्यार्थी उपस्थित होते.