एमबीएच्या विद्यार्थ्यांनी जाणून घेतली मेट्रोची कार्यपद्धती

0
138

पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि., पुणे मेट्रो आणि पीसीईटीज् एस. बी. पाटील इन्स्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने एमबीएच्या विद्यार्थ्यांसाठी पीसीएमसी मेट्रो स्टेशनचा पाहणी दौरा आणि मेट्रो प्रवास आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद मिळाला. २५० पेक्षा विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिक या अनोख्या मेट्रो दौऱ्यात सहभागी झाले.

या वेळी महा मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.चे डीजीएम एमएमआय अँड टीपी मा. टी. मनोज कुमार डॅनिएल,मा. संचालिका डॉ. कीर्ती सुधाकर धारवाडकर, मा. सहाय्यक प्राध्यापक डॉ. अनिलकुमार कारिया,डॉ. काजल माहेश्वरी उपस्थित होते.

पीसीईटीज् एस.बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये शिक्षण घेत असेल्या एमबीएच्या विद्यार्थ्यांकरिता या मेट्रो दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विद्यार्थ्यांनी पीसीएमसी स्टेशन ते सिव्हील कोर्ट स्टेशन असा मेट्रो प्रवास केला. विद्यार्थ्यांनी मेट्रो स्थानकांची कार्यप्रणाली समजून घ्यावी तसेच त्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे महत्त्व समजावे यासाठी या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. मेट्रो प्रवासामध्ये विद्यार्थ्यांना वाढते प्रदूषण, त्यातून निर्माण झालेली आव्हाने आणि त्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे महत्त्व सांगण्यात आले. या प्रसंगी पुणे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी मेट्रोविषयी अभ्यागतांना माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले. तसेच त्यांच्या सूचनांची नोंद घेतली. पीसीएमसी स्मार्ट सारथी टीमने या कार्यक्रमाचा प्रचार-प्रसार आणि समन्वय साधण्याची भूमिका निभावली.