पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – उगवता सूर्य पाहायचा असेल तर दहा लाख रुपये कॅश उद्या रेडी ठेव, अशी धमकी देत चिंचवड एमआयडीसी मधील सहाय्यक अभियंत्याला खंडणी मागणा-या आरोपीला खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे.रोशन बबन कानगुडे (वय 22, रा. आंबी गाव, ता. मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. संतोष दत्तात्रय सुवर्णकार (वय 46, रा. एमआयडीसी चिंचवड) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 21) रात्री एमआयडीसी ऑफिस, चिंचवड येथे घडली.
फिर्यादी हे चिंचवड एमआयडीसी कार्यालयात सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत आहेत. ते एमआयडीसी ऑफिस मध्ये काम करत असताना 9405470478 या क्रमांकावरून त्यांना रात्री नऊ वाजता फोन आला. उगवता सूर्य पाहायचा असेल ना, तर दहा लाख रुपये कॅश उद्या रेडी ठेव. नाहीतर तुझ्या आयुष्याला कायमचा फुलस्टॉप लावून टाकतो, अशी धमकी दिली.
या गुन्ह्याचा समांतर तपास खंडणी विरोधी पथक करत होते. गुरुवारी (दि. 28) दुपारी तळेगाव एमआयडीसी मधील एका कंपनीच्या गेट समोरून पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने हा गुन्हा केल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडून 30 हजार 500 रुपये किमतीचे दोन मोबाईल फोन जप्त केले आहेत. आरोपीला पुढील कारवाईसाठी पिंपरी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.