एबी अर्ज गहाळ प्रकरणात निवडणूक निर्णय अधिकारी हणुमंत पाटील यांना हटविले

0
47

पिंपरी, दि. ६ : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १६ रावेत-किवळे मधील राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) पक्षाच्या उमेदवार जयश्री भोंडवे यांचा अर्जासोबत दिलेला एबी अर्ज निवडणूक कर्मचाऱ्यांकडून गहाळ झाल्याचे निदर्शनास आले. हे प्रकरण न्यायालयापर्यंत गेले. या गोंधळ प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी हणुमंत पाटील यांना हटविण्यात आले असून त्यांच्या जागी अर्चना तांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

महापालिकेच्या ‘ब’ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत येत असलेल्या १६,१७,१८ आणि २२ या चार प्रभागांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी पाटील यांची नियुक्ती केली हाेती. प्रभाग क्रमांक १६ रावेत-किवळे मधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या उमेदवार जयश्री भोंडवे यांनी अर्जासाेबत पक्षाने दिलेला एबी अर्ज जमा केला हाेता. मात्र, छाननीमध्ये त्यांचा एबी अर्ज उमेदवारी अर्जासाेबत नसल्याने त्यांना अपक्ष उमेदवार म्हणून घाेषित करण्यात आले.

एबी अर्ज जोडल्यानंतरही अपक्ष उमेदवार म्हणून घोषित केल्याने भोंडवे यांनी थेट मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली हाेती. न्यायालयाने ‘सीसीटीव्ही’ चित्रीकरण, इतर तांत्रिक पुराव्याची पडताळणी करून सुनावणी घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी सुनावणी घेतली. सर्व पुराव्याची पडताळणी केली. ‘सीसीटीव्ही’ चित्रीकरणामध्ये भोंडवे यांनी तीन वाजण्याच्या मुदतीच्या आत उमेदवारी अर्जासह एबी अर्ज सादर केल्याचे दिसून आले. त्यामुळे हर्डीकर यांनी भोंडवे यांचा भरलेला एबी अर्ज ग्राह्य धरून त्यांना पक्षाचे अधिकृत घड्याळ हे चिन्ह दिले. त्यामुळे जयश्री भोंडवे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

‘जयश्री भाेंडवे यांनी अर्ज दाखल करताना एबी अर्ज दिला हाेता. शेवटच्या दिवशी माेठ्या प्रमाणात अर्ज भरण्यासाठी गर्दी झाल्याने कार्यालयाकडून त्यांचा एबी अर्ज गहाळ झाला. त्यामुळे अर्ज छाननीमध्ये भाेंडवे यांना अपक्ष उमेदवार म्हणून ग्राह्य धरण्यात आले हाेते. याविराेधात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानुसार उमेदवार, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसाेबत सुनावणी घेतली. सीसीटीव्ही फुटेज, पाेच पावती यासह अन्य पुराव्याची तपासणी केली. पुराव्यानुसार भाेंडवे यांना त्यांच्या पक्षाचे अधिकृत घड्याळ चिन्ह दिले आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्याची बदली करावी, अशी विनंती विभागीय आयुक्तांकडे केली हाेती. त्यानुसार त्यांच्या जागी नवीन अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे, असे पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.