एफडीएने उचललं मोठं पाऊल; 31 डिसेंबरपर्यंत हॉटेल, पब, क्लबमध्ये…..

0
83

मुंबई, दि. 07 (पीसीबी) : डिसेंबर महीना उजाडताच अनेकांना 31 च्या पार्टी, अर्थात नववर्षाच्या सेलिब्रेशनचे वेध लागतात. बाहेर फिरायला जाऊन, तर काहींचे हॉटेलमध्ये जाऊन सेलिब्रेशनचे प्लान बनतात. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव वर्षाच्या स्वागतासाठी 31 तारखेला नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडतात. हॉटेल्स, रेस्टॉरंटमध्येही किंवा क्लबमध्येही पार्टीजचे आयोजन करण्यात येतं. मात्र याच पार्श्वभूमीवर एफडीएने मोठं पाऊल उचललं आहे.

या पार्टीदरम्यान संधी साधून निकृष्ट दर्जाच्या अन्नपदार्थाचा पुरवठा होऊ नये, तसेच अन्नातून विषबाधा होऊ नये यासाठी अन्न आणि औषध प्रशासन (एफडीए) हॉटेल, रेस्टॉरंट, क्लबवर करडी नजर ठेवणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर 5 ते 31 डिसेंबरदरम्यान मुंबईतील हॉटेल, रेस्टॉरंट, क्लबमध्ये विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात येणार आहे.

या मोहिमेदरम्यान हॉटेल, रेस्टॉरंट, क्लब आणि उपहारगृह या आस्थापनांमध्ये अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 व त्याअंतर्गत नियम व नियमांचे काटेकोरपणे पालन होते किंवा नाही याबाबत खातरजमा करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ मधील तरतुदींनुसार सक्त कारवाई करण्याचे निर्देश सर्व सहायक आयुक्त (अन्न) व अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

अन्नपदार्थांची गुणवत्ता व दर्जाबाबत कोणतीही तक्रार असल्यास त्याची सविस्तर तक्रार प्रशासनाच्या मोफत क्रमांक 1800222365 वर करावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे 31च्या पार्टीसाठी हॉटेल किंवा पबमध्ये जाताना जपून जा असा सल्लाही ग्राहकांना देण्यात आला आहे