एनडीए नेतेपदी नरेंद्र मोदी यांची निवड

0
78

आज लोकसभेचे नेते म्हणून, भाजपाचे नेते म्हणून आणि एनडीचे संसदीय नेते म्हणून नरेंद्र मोदी यांची निवड करण्यात आली. राजनाथ सिंह यांनी मांडलेल्या प्रस्तावाला अमित शाह, नितीन गडकरी, चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार यांच्यासह सगळ्याच घटक पक्षांनी अनुमोदन दिलं. त्यानंतर मोदी यांनी भाषण केलं. एनडीएला मिळालेलं यश अभूतपूर्व आहे असं पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले आहेत नरेंद्र मोदी?
ज्यांनी ज्यांनी आपली सत्ता येण्यासाठी अथक प्रयत्न केले त्यांचे मी मनापासून आभार मानतो. एनडीएच्या नेते पदी माझी निवड करुन तुम्ही सगळ्यांनी मला नवी जबाबदारी दिली आहे. त्यामुळे मी तुमचा खूप खूप आभारी आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. माझ्यावरची जबाबदारी वाढली आहे. २०१९ मध्ये मी जेव्हा याच सदनात मी बोलत होतो तेव्हा मी म्हटलं होतं विश्वास. आज पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांनी माझी निवड केली आहे याचा अर्थ आहे की माझ्यावर तुम्ही विश्वास दाखवला आहे.

२२ राज्यांत एनडीएची सत्ता
माझ्यासाठी आजचा क्षण भावूक करणारा आहे. मी तुमचे जितके धन्यवाद देईन तेवढे कमीच आहेत. खूप कमी लोक यावर चर्चा करतात, कदाचित त्यांना ते पटत नसावं. पण इतक्या मोठ्या लोकशाही देशात एनडीएला २२ राज्यांत सत्ता मिळाली आहे आणि ते लोकांची सेवा करत आहेत. आमची ही युती खऱ्या अर्थाने भारताचा जो आत्मा आहे त्याचं प्रतीक आहे. जिथे आदिवासी बहुल समाज जास्त आहे अशा दहा पैकी सात राज्यांमध्ये एनडीएची सत्ता आहे आणि ते लोकांची सेवा करत आहेत. देशाच्या सेवेचं व्रत आपण हाती घेतलं आहे. आजवर निवडणूकपूर्व युती-आघाडी अनेकदा अनेकांनी केली आहे. मात्र एनडीएला जितकं यश मिळालं तितकं कुणालाच मिळालेलं नाही. सरकार चालवण्यासाठी बहुमत आवश्यक असतं. कारण लोकशाहीचा तो सिद्धांत आहे. मात्र देश चालवायचा असेल तर एकमत आवश्यक असतं. आज मी देशाला हा विश्वास देऊ इच्छितो की आम्हाला बहुमत देऊन सरकार चालवण्याची संधी दिली आहे त्यामुळे आम्ही देशाची प्रगती साधणार आहोत. असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

जनता आणि सरकार यांच्यातली दरी एनडीएने आपल्या कार्यकाळात मिटवली
देशाने असाही काळ पाहिला की सरकार आणि जनता यांच्यात एक अदृश्य दरी होती. मात्र एनडीएच्या दहा वर्षांच्या काळात ही दरी आपण मिटवली. येणाऱ्या दहा वर्षांच्या काळात मी अत्यंत जबाबदारीने बोलतो आहे. येणाऱ्या दहा वर्षांमध्ये गुड गव्हर्नन्स, विकास, लोकांचं आयुष्यमानाचा दर्जा वाढवणं यावर काम करणार आहोत. तसंच मला हे वाटतं मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय यांच्या आयुष्यात सरकारचा हस्तक्षेप जितका कमी होईल तितकी लोकशाही मजबूत होईल असंही मोदींनी यावेळी म्हटलं आहे.

तामिळनाडूत आपण जागा जिंकली नाही. एनडीएचं व्होट शेअरिंग वाढलं आहे त्यातून हे स्पष्ट आहे भविष्यात काय लिहून ठेवलं आहे. केरळमध्ये आपल्या शेकडो कार्यकर्त्यांनी बलिदान दिलं. देशाच्या राजकीय इतिहासात कुठल्याही विचारधारेवर इतका अन्याय झालेला नाही जितका केरळमध्ये झाला. तिथेही परिश्रमाची पराकाष्ठा केली, अनेक पिढ्यांनी मेहनत घेतली. त्याचं फळ हे आहे की केरळमधून एक जागा आली. अरुणाचाल प्रदेशात आपली पुन्हा सत्ता आली आहे. आंध्र प्रदेशात आजवरचं ऐतिहासिक मतदान झालं. तिथे आपल्याला मोठ्या प्रमाणावर जनमत मिळालं. असंही मोदी यांनी म्हटलं आहे.