एनआयटीच्या भूखंडावर प्लॉट पाडून विक्री; वकीलासह 7 जणांवर मोक्का..!

0
555

नागपूर, दि. १८ (पीसीबी) – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक शपथपत्रात २ गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप करणारे वकील सतीश उके यांच्यासह सात जणांवर नागपूर शहर पोलिसांनी मकोका कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत. ‘एनआयटी’ म्हणजे नागपूर सुधार प्रन्यासच्या भूखंडावर ले-आऊट टाकून सतीश उकेसह सात जणांनी प्लॉट विक्री केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सतीश उके आणि त्यांचे मोठे भाऊ प्रदीप उके सध्या ईडीच्या ताब्यात असून गेल्यावर्षी ३१ मार्च रोजी ईडीने त्यांना अटक केली होती.

उकेंवर जमिनी बळकावल्याचा आरोप : वादग्रस्त वकील सतीश उके व त्यांच्या कुटुंबाने गैरमार्गाने जमिनी बळकावल्याचा आरोप आहे. यासंदर्भात अजनी पोलीस ठाण्यात सतीश उके विरुद्ध गुन्हासुद्धा दाखल केला होता. याआधी नागपूर आर्थिक गुन्हे शाखेने सतिश उके आणि त्यांच्या भावाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.

मृतकावरही मकोका अंतर्गत गुन्हा दाखल : पोलिसांनी ज्या ७ आरोपींवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे, त्यामध्ये सुभाष बघेल यांचा देखील समावेश आहे. मात्र, सुभाष बघेल यांचा २००८ मध्येच मृत्यू झाला असून तब्बल पंधरा वर्षानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात पोलीस आयुक्तांना विचारले असता ते म्हणाले की, गुन्हा २००१ साली घडला आहे. ते त्यावेळी आरोपी होते. कायदेशीर प्रक्रियेनुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

शासनाची जमीन परस्पर विकल्याचा आरोप : अजनी भागात असलेल्या बाबूळखेडा येथे एनआयटीची ०.४१ हेक्टर जमिनी बळकावून त्या ठिकाणी सतीश उके यांनी बनावट कागदपत्रे आणि पॉवर ऑफ अटर्नी तयार केली. उके बंधूंनी कुटुंबीय आणि साथीदारांच्या मदतीने या जमिनीवर ले-आऊट टाकले. त्या भूखंडावर तब्बल ३६ प्लॉट पाडून ते नागरिकांना विकले आणि नागरिकांची मोठी फसवणूक केली. ज्यांची फसवणूक झालेली आहे त्यांनी याबाबत एनआयटीकडे तक्रार दिली होती. प्लॉट विक्री केल्या प्रकरणी नागपूर पोलिसांनी सतीश उकेसह ७ जणांवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. यात सतीश उके, प्रदीप उके, माधवी उके, शेखर उके, मनोज उके, सुभाष बघेल आणि चंद्रशेखर मते यांना आरोपी केले आहे.

कोण आहेत सतीश उके? तत्कालीन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीससह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात वकील सतीश उके यांनी न्यायालयात अनेक याचिका दाखल केल्या आहेत. त्यामुळे सतीश उके प्रसिद्धीच्या झोतात आले होते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील म्हणून देखील त्यांची ओळख आहे. गेल्यावर्षी ३१ मार्चच्या पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ईडीच्या पथकाने सतीश उके यांच्या निवासस्थानी धाड टाकली होती. त्यानंतर ईडीने वकील सतीश उके आणि त्यांचा भाऊ प्रदीप उकेला अटक करून मुंबईला नेले होते. तेव्हापासून उके बंधू ईडीच्या ताब्यात आहेत.