एटीएम मधून पैसे काढणं महागणार, जाणून घ्या नवीन अपडेट..

0
6

दि.२२ (पीसीबी)- देशात 1 एप्रिल 2026 पासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होत असून, यासोबतच बँकिंग क्षेत्रातही मोठे बदल लागू होणार आहेत. एचडीएफसी बँक, पंजाब नॅशनल बँक आणि बंधन बँकेसह अनेक बँकांनी एटीएम व्यवहार आणि पैसे काढण्याच्या नियमांमध्ये बदल जाहीर केले आहेत.

एचडीएफसी बँकेने महत्त्वाचा निर्णय घेत यूपीआय-आधारित एटीएम विथड्रॉलही आता मोफत व्यवहार मर्यादेत समाविष्ट केला आहे. म्हणजेच, यूपीआयद्वारे एटीएममधून पैसे काढल्यास ते मोफत व्यवहारांच्या मर्यादेत मोजले जाणार आहेत. ही मर्यादा ओलांडल्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी 23 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. महानगरांमध्ये 3 आणि नॉन-मेट्रो शहरांमध्ये 5 मोफत व्यवहारांची मर्यादा कायम ठेवण्यात आली आहे.

पंजाब नॅशनल बँकेनेही एटीएममधून पैसे काढण्याच्या दैनिक मर्यादेत कपात केली आहे. 1 एप्रिलपासून काही डेबिट कार्डधारकांना दिवसाला 1 लाख रुपयांऐवजी फक्त 50 हजार रुपये काढता येणार आहेत. तसेच, काही प्रीमियम कार्ड्ससाठी ही मर्यादा 1.5 लाखांवरून 75 हजार रुपयांवर आणण्यात आली आहे.

बंधन बँकेने देखील मोफत एटीएम व्यवहारांची संख्या कमी केली आहे. आता ग्राहकांना बँकेच्या एटीएममधून 5 वेळा आणि इतर बँकांच्या एटीएममधून 3 वेळा मोफत पैसे काढता येणार आहेत. त्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी 23 रुपये शुल्क आकारले जाईल.

दरम्यान, जिओ पेमेंट बँक क्यूआर कोड-आधारित पैसे काढण्याची नवी सुविधा सुरू करणार आहे. यामुळे ग्राहक यूपीआय क्यूआर स्कॅन करून बँक प्रतिनिधीकडून थेट पैसे काढू शकणार आहेत.

एकूणच, 1 एप्रिलपासून लागू होणाऱ्या या नव्या नियमांमुळे एटीएम वापर अधिक मर्यादित आणि खर्चिक होण्याची शक्यता असून, ग्राहकांनी व्यवहार करताना नव्या नियमांची माहिती ठेवणे अत्यावश्यक आहे.