एटीएमची अदलाबदल करून दोघांची फसवणूक

0
369

भोसरी, दि. २७ जुलै (पीसीबी) – एटीएम कार्डची अदलाबदल करून त्या कार्डद्वारे पैसे काढून घेतल्याच्या दोन घटना भोसरी परिसरात उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटना मंगळवारी (दि. 25) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास पुणे नाशिक महामार्गावर बँक ऑफ बडोदाच्या एटीएम सेंटर मध्ये घडल्या.

नंदकुमार रामचंद्र पाटील (वय 55, रा. मोशी प्राधिकरण) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पाटील हे त्यांच्या पत्नीला दागिने घेण्यासाठी गेले होते. दरम्यान ते भोसरी मधील बँक ऑफ बडोदाच्या एटीएम सेंटरमध्ये पैसे काढण्यासाठी गेले. तिथे दोन अनोळखी तरुण पैसे काढत होते. त्यांच्या शेजारी असलेल्या मशीन मधून फिर्यादी यांनी पैसे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे पैसे मशीन मधून बाहेर आले नाहीत. त्यावेळी एका तरुणाने फिर्यादी यांचा चेहरा सीसीटीव्ही कॅमे-याकडे करून सांगितले की, ‘सीसीटीव्ही मध्ये बघून पिन नंबर टाका. म्हणजे तुमचे पैसे बाहेर येतील.’ त्यानुसार फिर्यादी यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बघून पिन नंबर टाकला. मात्र तरी देखील त्यांचे पैसे मशीन मधून बाहेर आले नाहीत. दरम्यान फिर्यादी यांना त्यांच्या पत्नीचा फोन आल्याने ते घाईने मशीन मधील एटीएम कार्ड घेऊन सोने खरेदीसाठी गेले. सोने खरेदी केल्यानंतर त्यांच्या निदर्शनास आले की, त्यांच्या खिशात असलेले एटीएम कार्ड हे अनोळखी व्यक्तीचे आहे. काही वेळानंतर फिर्यादी यांच्या पत्नीच्या मोबाईलवर बँक खात्यातून काही रक्कम काढली गेल्याचा मेसेज आला. आपले एटीएम कार्ड बदलून त्याद्वारे अनोळखी व्यक्तींनी पैसे काढले असल्याने एटीएम कार्ड ब्लॉक करण्यासाठी फिर्यादी यांनी बँकेत धाव घेतली. त्यावेळी त्यांना माहिती मिळाली की, त्यांच्या खात्यातून 80 हजार रुपये काढण्यात आले आहेत. याबाबत तक्रार करण्यासाठी फिर्यादी पोलीस ठाण्यात आले. तिथे सचिन प्रभाकर खंडागळे यांची देखील अशाच प्रकारे एटीएम कार्डची अदलाबदल करून 35 हजार रुपयांची फसवणूक झाली असल्याचे समोर आले. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.