अमेरिकेनं यापूर्वीच भारतावर 50 टक्के टॅरिफ लादलं आहे. आता ट्रम्प यांनी एच-1 बी व्हिसाची फी वाढवून 1 लाख अमेरिकन डॉलर्स केली आहे. यापूर्वी ही फी 1 हजार अमेरिकन डॉलर्स होती. भारतीय चलनात याचा विचार केला तर यापूर्वी एका वर्षासाठी एच-1 बी व्हिसासाठी 88 हजार रुपये भरावे लागत होते. आता त्याचसाठी 88 लाख रुपये भरावे लागतील. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या निर्णयाचा इन्फोसिस आणि विप्रो सारख्या भारतीय कंपन्या ज्या अमेरिकन शेअर बाजारातील अमेरिकन डिपॉझिटरी रिसीटसवर 4 टक्क्यांपर्यंत घसरण पाहायला मिळाली आहे.
इन्फोसिसच्या ADRs मध्ये 4 टक्के तर विप्रोच्या ADRs 2 टक्के घसरण झाली आहे. अमेरिकेतील घडामोडींचा सोमवारी भारतीय शेअर बाजारात काय घडामोडी घडतात याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. नव्या नियमांनुसार H-1B व्हिसा अर्जासाठी कंपन्यांना दरवर्षी 1 लाख डॉलर भरावे लागतील. अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाकडे एच वन बीच्या अर्जांबाबत सर्वाधिकार असतील.
विश्लेषकांच्या मते भारतीय आयटी कंपन्यांसाठी हे मोठं आव्हान असणार आहे. मात्र, याचा कंपन्यांवर मोठा परिणाम होणार नाही. सध्या अमेरिकेत एच वन बी व्हिसा धारकांवर तातडीनं परिणाम होणार नाही. विश्लेषकांच्या मते H-1B कार्यक्रम सुरु राहू शकत नाही.
भारतीय कंपन्यांवर परिणाम
भारतीय आयटी कंपन्यांच्या कमाईचा सर्वाधिक वाटा उत्तर अमेरिकेतून येतो. काही कंपन्या त्यांच्या एकूण उत्पन्नाच्या एक तृतियांश किंवा दोन तृतियांश कमाई उत्तर अमेरिकेतून होते. यामुळं H-1B नियमातील बदल कंपन्यांच्या बिझनेस मॉडेलवर होऊ शकतो.
आयटी स्टॉक्सचं काय होणार?
निफ्टी आयटी निर्देशांकात गेल्या आठवड्यात 1 ते 3 टक्के तेजी पाहायला मिळाली होती. गुंतवणूकदारांचं लक्ष सोमवारी बाजार उघडण्याकडे असेल. आयटी निर्देशांक कसा राहणार यावर लक्ष राहील. इन्फोसिस, टीसीएस, विप्रो, दुसऱ्या आयटी स्टॉक्सचं काय होतं याकडे गुंतवणूकदाराचं लक्ष राहील.
दरम्यान, भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. येत्या काही दिवसात व्यापार करार होण्याची शक्यता आहे.