एक हजार टक्के परतावा मिळणार म्हणून गुंतवले 82 लाख रुपये

0
131

सायबर भामट्यांनी घातला गंडा

दि 29 मे (पीसीबी ) – तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर 300 ते 1000 टक्के परतावा मिळेल, असे आमिष दाखवून एका व्यक्तीला गुंतवणूक करण्यास भाग पाडले. व्यक्तीने देखील भलामोठा परतावा मिळणार असल्याने तब्बल 82 लाख 59 हजार रुपये गुंतवणूक केली. मात्र ही गुंतवणूक घेतल्यानंतर सायबर भामट्यांनी गुंतवणूकदार व्यक्तीला कोणताही परतावा अथवा गुंतवलेली रक्कम परत न देता फसवणूक केली. हा प्रकार 18 एप्रिल ते 28 मे या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून सांगवी येथे घडला.

याप्रकरणी 40 वर्षीय व्यक्तीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मॉर्गन स्टेनले कंपनीचे आर्थिक सल्लागार डॉ. ध्रुव पारेख, लिंडा (पूर्ण नाव माहिती नाही. रा. वन वर्ल्ड सेंटर, मुंबई), व्हाटस अप ग्रुप मधील इतर सदस्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी डॉ. ध्रुव पारेख याने तो मॉर्गन स्टेनले या कंपनीचा आर्थिक सल्लागार असल्याचे भासवले. त्याने सोशल मिडीयावर आर्थिक गुंवणूक केल्यास चांगला फायदा होईल, अशा आशयाची जाहिरात दिली. फिर्यादी यांनी ती जाहिरात पाहून त्यावर गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला.

आरोपींनी दिलेल्या लिंकद्वारे फिर्यादी यांनी संपर्क केला असता त्यांना तब्बल 300 ते 1000 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवण्यात आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात परतावा मिळणार असल्याने फिर्यादी यांनी गुंतवणूक करण्यास होकार दिला. दरम्यान आरोपींनी त्यांना एका एप वरून शेअर मार्केटमधील गुंतवणुकीबाबत माहिती दिली.

त्यानंतर शेअर खरेदीसाठी फिर्यादीकडून आरोपींनी वेगवेगळ्या बँक खात्यांवर तब्बल 82 लाख 59 हजार रुपये घेतले. त्यानंतर त्यांना गुंतवणुकीवरील परतावा अथवा त्यांची गुंतवणूक केलेली रक्कम परत न करता फसवणूक केली. आपण गुंतवलेली देखील रक्कम परत मिळत नसल्याने फिर्यादी यांनी पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.