एक भाऊ कुणबी दुसरा मराठा

0
2106

पुणे, दि. २ (पीसीबी) – राज्यात मराठा आरक्षणावरून सध्या सगळीकडेच गदारोळ सुरू आहे. अनेक ठिकाणी आंदोलन आणि उपोषण केली जात असून बऱ्याच ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलंय. यानंतर राज्य सरकारनं मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटण्याबाबत आदेश दिले आहेत. मात्र या कुणबीमध्ये देखील अनेक गोंधळ असल्याचं पुणे जिल्ह्यात समोर आलंय. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील म्हाळुंगे या गावात दोन सख्ख्या भावांचे दाखले वेगवेगळे असल्याचं समोर आलंय. एकाच्या प्रमाणपत्रावर कुणबी तर दुसऱ्या भावाच्या प्रमाणपत्रावर हिंदू मराठा अशी नोंद आढळली आहे. त्यामुळे शिंदे समितीनं तयार कलेला अहवाल कितपत फायदेशीर ठरणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय.

एकाच गावात आढळल्या 1120 नोंदी : पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील म्हाळुंगे या गावातील जना कृष्णाजी आंबटकर यांच्या दाखल्यावर कुणबी आणि त्यांचा भाऊ सुदाम कृष्णाजी आंबटकर यांच्या दाखल्यावर हिंदू मराठा अशी नोंद आहे. त्यामुळं हा पेच निर्माण झालाय. आंबेगाव तालुक्यातील फक्त एकाच गावात 1120 नोंदी आढळल्या आहेत. त्यामुळं अशा अनेक गावांच्या नोंदी समोर येणं बाकी आहे. मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील सुमारे पावणेदोन कोटी कुणबी संदर्भात नोंदी तपासल्या असता 13 हजार 498 जुन्या कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत, असं शिंदे समितीच्या अहवालामध्ये म्हटलंय. मात्र, ही आकडेवारी ही मराठवाड्यातील असल्याची समोर आलीय.

कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यावर टाकले जाळून : शिंदे समितीच्या अहवालात काहींच्या नोंदी कुणबी तर त्यातील काही नोंदी मराठा म्हणून आढळल्या आहेत. सरकारला फक्त धोरणात्मक निर्णय मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे. तेवढ्यासाठी किती आढेवेढे घेणार? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. कुणबी प्रमाणपत्राचं वाटप झाल्यानंतर अनेक ठिकाणी तरुणांनी ते कागदपत्रेदेखील जाळून देखील टाकले आहेत. मात्र, आंबेगाव तालुक्यातील दोन भावंडांची वेगवेगळे प्रमाणपत्र व्हायरल झाल्यानं पुन्हा कारभाराबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित झालंय.