एक दिवस असा येईल, उद्धव ठाकरे देश सोडून जातील; रामदास कदमांची ठाकरेंवर जहरी टीका

0
25

मुंबई, दि. 29 (पीसीबी) : राज्यातील शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर शिवसेनेत दोन गट तयार झाले. शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम शिवसेना उबाठाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची संधी सोडत नाही. आता त्यांनी उद्धव ठाकरे यांचे भविष्य सांगितले आहे. रामदास कदम म्हणाले, ‘एक दिवस असा येईल की उद्धव ठाकरे रात्री दोन वाजता आपल्या कुटुंबाला घेऊन देश सोडून जातील’, असे माझे शब्द आहेत. तुमच्याकडे लिहून ठेवा. बाळासाहेब यांच्याशी त्यांनी जी बेईमानी केली. शिवसेना प्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यांनी जे पाप केले. त्या पापाचे प्राश्चित्य उद्धव ठाकरेंना भोगावच लागेल, असा जोरदार हल्ला रामदास कदम यांनी केला.

शिंदे गटाचे नेते रामदास कदम सहकुटुंब साईदरबारी आले. त्यावेळी माध्यमांशी ते बोलत होते. यावेळी रामदास कदम म्हणाले, साईबाबांनी महायुतीला मोठा कौल दिला आहे. दोन दिवसांत महायुतीचे सरकार बनेल. महाराष्ट्रातील जनतेने 18 ते 20 तास महाराष्ट्रात काम करणारा मुख्यमंत्री पाहिला. ते व्यक्तीमत्व म्हणजेच एकनाथ शिंदे आहे. मागच्या वेळी आमचा आकडा कमी असताना आम्हाला भाजपच्या वरिष्ठांनी संधी दिली. आता भाजपचे 133 हून अधिक आमदार स्वतःचे आहे. त्यामुळे आम्ही किती मागावे? काय मागावे? याचे भान ठेवलं पाहिजे, असे त्यांनी म्हटले. आम्हा सर्वांचीच इच्छा की एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत. परंतु भाजपला देखील त्यांचा पक्ष चालवायचा आहे. त्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. महायुतीमध्ये कुठलाही मतभेद नाहीत, असे कदम यांनी सांगितले.

महाविकास आघाडीकडून पराभवाचे खापर ईव्हीएमवर फोडले जात आहे. त्याबद्दल बोलताना रामदास कदम म्हणाले, लोकसभेत त्यांना जास्त जागा मिळाल्या. जास्त खासदार निवडून आले. तेव्हा त्यांनी ईव्हीएम मशिनवर कुठे खापर फोडले का? नाही ना. मग आता विधानसभेत महायुतीच्या बाजूने निकाल लागला. त्यामुळे त्यांना कारण हवे आहे. बाजूने निकाल लागला की मशीन चांगले आणि विरोधात निकाल लागला की मशीन वाईट, असा कसा तुमचा निकष आहे, असा प्रश्न रामदास कदम यांनी विचारला.