एक्स गर्लफ्रेंडच्या गळ्यावर वार; तरुणाला अटक

0
186

दि २९ मे (पीसीबी ) – गर्लफ्रेंडचा एक्स बॉयफ्रेंड तिला भेटायला आल्यानंतर त्याच्या अंगावर कार घालून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची पिंपरी येथील घटना ताजी असतानाच रावेत मधून आणखी एक घटना समोर आली आहे. मागील दीड वर्षांपूर्वी ब्रेकअप झाल्यानंतर तरुणाने तरुणीला आडबाजूला नेऊन तिच्या गळ्यावर आणि हातावर धारदार शस्त्राने वार करत तिचा खून करण्याचा प्रयत्न केला.

आसिफ मोहम्मद शेख (वय 24, रा. किवळे) याला रावेत पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी जखमी 19 वर्षीय तरुणीने रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीने आरोपी शेख याच्यासोबत असलेले प्रेमसंबंध मागील दीड वर्षांपूर्वी पूर्णपणे तोडले होते. त्याचा राग शेख याच्या मनात होता. सोमवारी (दि. 27) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास तरुणी कामावरून घरी जात होती. त्यावेळी शेख याने तिला किवळे येथील एका मोकळ्या जागेत नेले.

मोकळ्या जागेत नेऊन तरुणीला मारहाण केली. तरुणीला जीवे मारण्याच्या उद्देशाने तरुणीचा गळा दावून धारदार शस्त्राने तिच्या गळ्यावर आणि हातावर वार केले. यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आहे. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

पिंपरीत गर्लफ्रेंडच्या एक्सला जीवे मारण्याचा प्रयत्न

आपल्या गर्लफ्रेंडसोबत तिचा एक्स बॉयफ्रेंड वाद घालत असल्याचे पाहिल्याने संतापलेल्या प्रियकराने त्या तरुणाच्या अंगावर कार घालून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्यानंतर पिंपरी पोलिसांनी कार अंगावर चालवणाऱ्या तरुणाला बेड्या ठोकल्या आहेत.