एक्साईड इंडस्ट्रीज कामगारांचे तीन महिन्यांपासून आंदोलन

0
10
  • दबाव टाकण्यासाठी १२० कामगारांना दुसऱ्या प्लांट मध्ये बदली
    पिंपरी, दि. २२ पीसीबी –एक्साईड इंडस्ट्रीज कामगारांचे गेल्या तीन महिन्यांपासून आंदोलन सरू आहे. कामगारांनी पहिली कामगार संघटना बदलून दुसऱ्या संघटनेचे सभासदत्व घेतले म्हणून दबाव टाकण्यासाठी १२० कामगारांना दुसऱ्या प्लांट मध्ये बदली केल्याचे आदेश काढण्यात आले आहेत. व्यवस्थापनाच्या या निर्णयाविरोधात ९५ दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे.
    संघटना पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार, एक्साईड इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीमधील ३४१ पैकी ३३५ कायम कामगारांनी अडीच वर्षांपूर्वी दिनांक १४/०५/२०२२ रोजी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ या संघटनेचे सभासदत्व स्वीकारले. चिंचवड प्लांट येथील कामगार त्यांच्या दोन पिढया पासून कंपनीत काम करीत आहेत. मागील ५५ वर्षाच्या इतिहासात व्यवस्थापनाने कोणत्याही कामगाराला दुसऱ्या प्लांट मध्ये बदली आदेश दिला नाही, परंतु पूर्वीच्या युनियनन सोबत हात मिळवणी करून कामगारांवर दबाव टाकण्यासाठी सुमारे १२० कामगारांना दुसऱ्या प्लांट मध्ये बदली आदेश देण्यासाठी धमकावले जात होते म्हणून तेथील कामगारांनी युनियन बदलली.
    संघटना बदलल्यामुळे कंपनी व्यवस्थापनाने सुडबुद्धीने आजपर्यंत विविध कारणे दाखवून एकूण ३१ कामगारांवर कारवाई करून त्यांना बडतर्फ करण्यात आले. त्यामधील दहा कामगारांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी काहीच कारण भेटले नाही म्हणून केवळ युनियन बदलाच्या प्रक्रियेत अग्रभागी होते म्हणून त्यांना परराज्यात म्हणजेच हरियाणा, बावळ येथे बदली आदेश देण्यात आला आहे.

स्थानिक कायम कामगारांना कंपनी बाहेर काढून (युपी , बिहार , नेपाळ, येथील) परराज्यातून आलेल्या कंत्राटी कामगारांच्याकडून उत्पादकता काढून घेतली जात आहे. कामगार आयुक्त कार्यालय, पुणे यांनी आत्तापर्यंत कंपनीवर एकूण ५२ खटले मोरवाडी कोर्ट, पुणे येथे दाखल केले आहे आणि कंत्राटे रद्द करण्याचा दिनांक १३/०१/२०२३ रोजीचा प्रस्ताव जा. क्र. का. ऊ. आ/अंमल/नि. प्र./९७० मंत्रालयात प्रलंबित आहे. दरम्यानच्या काळात दिनांक २३/०८/२०२२ रोजीपासून १६५ दिवस कॅन्टीन बहिष्कार आणि काळी फीत बांधून निषेध आंदोलन केले. यावर कारखाना निरीक्षक कार्यालय पुणे यांनी कंपनी मालकावर शिवाजीनगर कोर्ट पुणे येथे एक खटला क्र. ११५१४/२०२३ दाखल केला होता. व्यवस्थापनाला न्यायालयाने दोषी ठरविले आहे. कामगारांनी दिनांक २३/०३/२०२३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पिंपरी येथे एक दिवसीय ठीय्या आंदोलन केले.
कामगार आयुक्त यांच्या मध्यस्थीने दिनांक २४/०५/२०२३ रोजी सह्याद्री अतिथी गृह मुंबई येथे मा. कामगार मंत्री यांचे समोर त्यांच्या दालनामध्ये एक मीटिंग आयोजित केली होती. तेथे झालेल्या चर्चेनुसार पुढे उभय पक्षांमध्ये चर्चासत्र चालू झाले. वरील बैठकीनंतर दिनांक २७/०५/२०२३ रोजी भ्रमणध्वनी द्वारे व्यवस्थापनाने दहा बदली कामगारांना स्वेच्छानिवृत्त होण्याचा प्रस्थाव दिला परंतु संघटनेने त्या कामगारांना स्वेच्छा निवृत्ती बाबत चर्चा करण्यास मनाई केली आणि संघटनेसोबत चर्चा करा असे सांगण्यास सांगितले. कामगारांनी प्रस्ताव फेटाळल्यानंतर व्यवस्थापनाने दहा बदली कामगारांना विना खातेनिहाय चौकशी करता कामावरून बडतर्फ केले.

कंपनीतील सर्व कामगार दिनांक ३०/१०/२०२३ पासून बेमुदत संपावर बसले होते. परंतु मा. कामगार आयुक्त कार्यालय, पुणे यांनी सदर प्रकरणात मध्यस्थी केली असता त्यांच्या विनंतीचा मान राखून दिनांक ७/११/२०२३ संप मागे घेण्यात आला. समेट कार्यवाहीमत एक महिन्याचा कालावधी घेऊन ३१ कामगारांच्यावर सकारात्मक चर्चा करून त्यांना पुन्हा कामावर रुजू करून घेण्याचे ठरले. परंतु व्यवस्थापनाने वेळखाऊ धोरण सुरूच ठेवल्याने दिनांक २८/०२/२०२४ रोजी नरीमन भवन, नरीमन पोइंट, मुंबई येथील कामगार मंत्री यांच्या दालनात पुन्हा एक बैठक लावण्यात आली तेथे व्यवस्थापन गैरहजर राहिले. संप मागे घेऊन आजच्या तारखेपर्यंत सुमारे १४ महिने झाले तरीही व्यवस्थापनाने बाहेरील कोणत्याही कामगारांवर कोणताही तोडगा काढला नाही. गेल्या अडीच वर्षापासून बाहेरील ३१ कामगारांचे वेतन बंद असून त्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे खूप हाल चालू असून ते देशोधडीला लागले आहेत. त्यांचे कुटुंब अक्षरश: उध्वस्त झाले आहेत. गृह कर्जाचे हप्ते थकल्यामुळे त्यांच्या घरांच्यावर जप्तीचा प्रसंग ओढवला आहे. त्यांच्या मुलांच्या शाळेची फी न भरू शकल्यामुळे त्यांचे शिक्षण मधेच बंद करण्याची वेळ आली आहे. वृध्द आई वडिलांच्या दवाखान्याचा खर्च भागविणे त्यांना कठीण झाले आहे. त्यांच्यावर सध्या उपासमारीची वेळ आली आहे.
दहा बदली कामगार हे नवखे कामगार नसून प्रत्तेकाच्या सेवेचा कार्यकाल हा १५ वर्षे ते ३२ वर्षापर्यंतचा आहे. आमच्या पैकी ४ कामगारांची उर्वरित सेवा हि ५ वर्षापैकी कमी राहिली आहे. एका कामगाराचे तर इथून पुढे फक्त दोनच महिने राहिले आहे. सदर बदली करताना कोणत्या पॉलिसीचा वापर केला? हे अद्याप कोणालाही समजले नाही. बदली आदेश दिल्यानंतरही या कामगारांना संघटनेची साथ सोडण्यासाठी विविध आमिषे व्यवस्थापना तर्फे देण्यात आली. हे कामगार व्यवस्थापनाच्या कुठल्याही अमिषाला बळी न पडता संघटनेसोबत प्रामाणिक राहिले, गेल्या अडीच वर्षापासूनच्या संघर्षात विनावेतन राहिले. इतका त्याग करूनही आज त्यांच्या वाट्याला संघर्षच आहे.
बदलीच्या मुद्द्यावरून कामगारांनी युनियन बदलली आणि आज रोजी अडीच वर्षे संघर्ष करूनहि कामगारांना व्यवस्थापन बदली होण्यासच सांगत आहे कंपनी व्यवस्थापनाने आत्तापर्यंत ४ वेळा चर्चेने प्रश्न मिटवण्याचे आश्वासन देऊन त्यांचे आंदोलन मोडले आहे आणि वेळखाऊ धोरण चालूच ठेवले आहे. म्हणून नाईलाजाने दहा कामगार दिनांक १८/१२/२०२४ पासून बेमुदत धरणे आंदोलनाला बसले आहे, गेले ९३ दिवसापासून आमचे आंदोलन चालू आहे परंतु संघटना आणि व्यवस्थापन यांनी काहीच तोडगा काढला नाही म्हणून आम्ही आजच्या ९४ व्या दिवशी मुंडण आंदोलन केले आहे. आम्ही गेल्या तीन वर्षांमध्ये आमचे सर्वस्व गमावले असून आणखी गमावण्याची आता आमच्याकडे आमची हिम्मत आणि जीव बाकी आहे. आणि जो पर्यंत आम्हाला आम्हाला हक्क किंवा योग्य तो न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनस्थळी बसून राहण्याचा निर्णय घेतला आहे. आणि न्याय न मिळाल्यास तेथेच जीव सोडून देण्याचा निशचय केला आहे. असे आंदोलकांचे म्हणणे आहे