दि. १५(पीसीबी) – मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात सध्या चांगलाच गाजत आहे. विशेष म्हणजे या आरक्षणामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार केंद्रस्थानी राहिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात येत आहे. जरांगे यांच्यामागे शरद पवार असल्याचा दावा ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके यांच्याकडून करण्यात येत होता. यावर आता स्वतः शरद पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे.
‘मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाशी आमचा कसलाही संबंध नाही. ज्यांच्याशी आमचा संबंध नाही, त्यांच्याविषयी जास्त बोलणे योग्य नाही.’ असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे रविवारी (ता.14) नाशिकमध्ये शिबिर झाले. यावेळी पवारांनी माध्यमांशी संवाद साधला.
नेमकं काय म्हणाले पवार?
आरक्षणाचा प्रश्न सर्वांनी एकत्र येऊन सोडवायला हवा. सरकारने स्थापन केलेल्या उपसमित्यांवर टीका करताना पवार म्हणाले, सरकार कुठल्या जातीधर्माचे नाही सरकारने सर्वव्यापक असावे. मराठा आणि ओबीसी उपसमिती सरकारने स्थापन केली आहे. एक समिती एका मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली आणि दुसरी दुसऱ्याच्या अध्यक्षदेखील हे योग्य नाही.समिती एका जातीची करू नका, समाजाची करा. सामाजिक ऐक्य हवे, त्यात अंतर नको, हाच माझ्या सांगण्याचा उद्देश असल्याचे पवार यावेळी म्हणाले.