एकाच कुटुंबातील चारजणांचे लटकलेले मृतदेह आढळलेआत्महत्या की हत्या यावर तर्कवितर्क

0
53

पिंपरी, दि. ०३ (पीसीबी) – एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने नागपूर जिल्हा हादरला आहे. नरखेड तालुक्यातील मोवाडमध्ये राहणारे सेवानिवृत्त शिक्षक विजय पचौरी यांच्या कुटंबातील चारजण मृतावस्थेत आढळले आहेत. मृतांमध्ये विजय पचोरी (वय ६८), पत्नी मालाबाई पचोरी (वय ५५), मुलगा दीपक (वय ३८) व गणेश (वय ३८) यांचा समावेश आहे. ही आत्महत्या आहे की हत्या आहे, याबाबतचे चित्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली असून हे चारहीजण लटकलेल्या अवस्थेत आढळले. या चौघांनी सामूहिक आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.यामुळे मोवाड आणि परिसरात भीतीचे वातावरण आहे.

घटनेची माहिती मिळताच नागपूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले असून पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. तसेच फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी पोहोचली आहे. या कुटुंबाने आपले आयुष्य एकाएकी का संपवले? ही आत्महत्या आहे की हत्या, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत असून पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.

मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांना एक सुसाईड नोटही सापडली असून त्यावर चौघांच्या सह्या आहेत. मृतदेह सापडलेल्या दोन मुलांचे अजून लग्न झालेले नव्हते. दोघेही आई-वडिलांसोबत राहत होते. सहकारी संस्थेत फसवणूक केल्याप्रकरणी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. मध्य प्रदेशातील पांडुरा सहकारी संस्थेच्या तक्रारीवरून मुलाला अटकही झाली होती. महिन्यापूर्वीच त्याला जामीन मिळाला होता, असा तपशील नोटमध्ये आहे.

यापूर्वी अलीकडेच दिल्लीतही एकाच कुटुंबातील पाच सदस्य अपार्टमेंटमध्ये मृतावस्थेत आढळले होते. मृत पुरुष आणि त्याच्या चार मुलींनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. शेजाऱ्यांना घरातून दुर्गंधी येऊ लागल्याने पोलिसांना बोलावले, वडिलांनीच आपल्या मुलीला विष पाजल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केला. चारही मुली शारीरिकदृष्ट्या अपंग असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांचे वय ८ ते १८ वर्षे दरम्यान होते.

यापूर्वी जुलै महिन्यात नागपुरात पती-पत्नीने आत्महत्या केली होती. मूळचा केरळचा असलेला रिजू त्याची पत्नी प्रिया नायरच्या ब्लड कॅन्सरमुळे त्रस्त होते. त्याने आपल्या ११ वर्षाच्या मुलीलाही विष दिले. मात्र ती वाचली. व्यवसायाने चित्रकार असलेल्या रिजूला शहरात कमाई करता येत नव्हती. त्याला आपला बहुतेक वेळ आपल्या आजारी पत्नीसोबत घालवावा लागत होता.