एकनाथ शिंदे शपथ घेणार…

0
36

मुंबई, दि. 05 (पीसीबी) : महायुतीच्या ग्रँड शपथविधी अगोदरच पुन्हा एकदा नाराजी नाट्य समोर आले आहे. शपथविधीला अवघे साडेतीन तास बाकी असतानाच शिंदे सेना मात्र अस्वस्थ असल्याची दिसते. आज शिंदे सेनेच्या शिलेदारांनी भराभर पत्रकार परिषदांचा सपाटा लावला आहे. ज्या पत्रिका समोर आल्या आहेत. त्यात ही शिंदे हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील की नाही याचा सस्पेन्स कायम आहे. काल महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद झाली. त्यात हास्य कल्लोळ पाहीला तर खुललेले चेहरे पाहीले. पण दिसते तसे नसते असेच संकेत मिळत आहेत. हे दबाव तंत्र असल्याचा दावा करण्यात येत आहे. काल वर्षावर पण मोठी नाट्यमय घडामोड घडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काय घडतंय राज्याच्या राजकारणात?

फडणवीस-बावनकुळे वेटिंगवर
काल वर्षावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस हे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यावेळी या दोन्ही नेत्यांना लागलीच भेट घेता आली नाही. त्यांना वेटिंगवर ठेवल्याची माहिती समोर येत आहे. शिंदे यांना भेटण्यासाठी त्यांना 15 मिनिटं वेटिंगवर ठेवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री पदासह इतर काही महत्त्वाची खाती पदरात पाडून घेण्यासाठी शिंदे गोटातून दबाव तंत्राचा, नाराजी नाट्याचा नवीन अध्याय समोर येत असल्याचा दावा करण्यात येत आहे.
मनधरणी करण्यात यश
आताच हाती आलेल्या माहितीनुसार, गेल्या काही तासांपासून वर्षावर पुन्हा नाराजी नाट्यसमोर आले. निमंत्रण पत्रिकेवर एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील असे काही स्पष्ट झाले नाही. अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील असे ठरलेले असताना या नवीन नाराजी अंकाने पुन्हा राज्याच्या राजकारणात नवीन ट्विस्ट आणला.
पण आता हाती आलेल्या वृत्तानुसार, एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी तयार झाल्याचे समजते. उदय सामंत, भरत गोगावले, संजय शिरसाट काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला वर्षा बंगल्यात दाखल झाले होते. तर संजय गायकवाड आणि दीपक केसरकर आधीच वर्षा बंगल्यावर थांबलेले होते. या सर्वांनी त्यांना उपमुख्यमंत्री पदासाठी राजी केले. आता एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदासाठी तयार झाले तरी गृहमंत्री पदावरून पेच कायम असल्याचे अजूनही दिसत आहे.