मुंबई, दि. 03 (पीसीबी) : राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरे गावातून ठाण्यातील निवासस्थानी रविवारी परतले असले तरी त्यांची प्रकृती पूर्णपणे बरी झालेली नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी सोमवारी निवासस्थानीच विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. शिवसेना (शिंदे) पक्षातील काही नेते आणि भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी शिंदे यांची सोमवारी निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दरम्यान सत्तास्थापनेसंबंधी उलट सुलट बातम्या समोर येत असताना आता आम आदमी पक्षाच्या माजी नेत्या अंजली दमानिया यांच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे भलतीच चर्चा पुढे आली आहे. एकनाथ शिंदे विरोधी पक्षात बसणार आहेत का? असा प्रश्न दमानिया यांनी उपस्थित केला आहे.
अंजली दमानिया यांनी दोन पोस्ट टाकून सत्तास्थापनेबाबत वेगळाच दावा केला आहे. त्या म्हणाल्या, “विरोधी पक्षच संपवण्याचा हा भाजपचाच का कट आहे का? सत्ता पण आमचीच आणि विरोधी पक्ष पण आमचाच. बाकी पक्ष / विरोधी पक्ष नेते अस्तित्वात ठेवायचे नाहीत. गावी जाणे, ताप येणे, पुन्हा घरी येणे, पुन्हा बरे न वाटणे ही भाजपाची स्क्रिप्ट वाटते”
या पहिल्या पोस्टनंतर दमानिया यांनी आणखी एक पोस्ट केली आहे. ज्यात त्या म्हणतात, “एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? परवाच संध्याकाळी, आमच्या काही कार्यकर्त्यांना मी एक पत्रकार भाऊंशी झालेला संवाद सांगत होते. ४ दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन भाजपाला समर्थन देणारे शिंदे अचानक गावी गेले, मग ताप काय आला, मग घरी काय आले, दाल मे कूछ काला है.”
अंजली दमानिया यांनी हा कयास कार्यकर्ते आणि माध्यमांशी झालेल्या चर्चेतून लावला आहे. याबाबत त्यांनी कोणतीही ठोस माहिती दिलेली नाही. मात्र त्यांच्या या नवीन चर्चेमुळे सत्तास्थापनेबाबतचे गूढ लक्षात येते. भाजपाकडून शपथविधीचा मुहूर्त जाहीर झालेला असला तरी अद्याप गटनेता निवडणे बाकी आहे. तसेच खातेवाटपाची चर्चा अंतिम झालेली नाही, याची माहिती नेत्यांच्या प्रतिक्रियेतून समोर येत आहे.
दरम्यान सत्तास्थापनेच्या हालचाली वाढल्या असतानाच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे सोमवारी रात्री नवी दिल्लीत दाखल झाले. महायुती सरकारमध्ये राष्ट्रवादीला चांगली खाती मिळावीत आणि मंत्रीपदे अधिक मिळावीत, अशी पवार यांची भूमिका आहे. महायुतीला बहुमत मिळताच अजित पवार यांनी लगेचच देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत, अशी भूमिका मांडली होती. शिंदे यांनी गेले चार दिवस फारच ताणून धरल्याने भाजपचे नेतृत्व अजित पवारांना झुकते माप देण्याची शक्यता नाकारता येत नाही.