नाशिक, दि. २२ (पीसीबी) : शिंदे गटातील आमदार सुहास कांदे यांनी आज माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशामुळेच एकनाथ शिंदे यांना सुरक्षा व्यवस्था नाकारण्यात आली असल्याचा गौप्यस्फोट सुहास कांदे यांनी केला आहे.
एकनाथ शिंदे यांना नक्षलवाद्यांकडून धोका असतानाही तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी झेड प्लस सुरक्षा व्यवस्था नाकारली असल्याचा गंभीर आरोप सुहास कांदेंनी केला आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात एकनाथ शिंदे हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री होते.
त्यावेळी गडचिरोलीतील नक्षलवाद्यांकडून शिंदे यांच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणांनी दिला होता. शिंदेंना झेड प्लस सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय गृहविभागाने घेतला होता, असा दावा आमदार कांदे यांनी केला.
“एकनाथ शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकाळी साडेआठवाजता तत्कालीन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना फोन करून झेड प्लस सुरक्षा व्यवस्था नाकारण्याची सूचना दिली होती, असा मोठा गौप्यस्फोट सुहास कांदे यांनी केला आहे.
राज्याचे माजी पर्यटन मंत्री,युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत. ठाकरेंची शिव संवाद यात्रा नाशिकमध्ये धडकणार आहे. या दौऱ्यात कांदे (Suhas Kande) हे आदित्य ठाकरेंना भेटणार असल्यामुळे नाशिकचं राजकारण तापलं आहे. कांदे आदित्य ठाकरेंची 5 हजार कार्यकर्त्यांसह भेट घेणार आहेत.
आदित्य ठाकरे यांना नाशिक दौऱ्यात कांदे (Suhas Kande) निवेदन देणार आहे. यात ते ‘माझं काय चुकलं’ या आशयाखाली मतदारसंघातील कामांची यादी आणि हिंदुत्व या विषयावरून शिवसेना कशी दूर गेली याबाबतचा उल्लेख त्यांनी निवेदनात केला आहे.