एकनाथ शिंदे यांच्या बॅनरवर अंडी, काळी शाई फेकली

0
253

नाशिक , दि. २४ (पीसीबी) – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरुद्ध बंड पुकारुन चार दिवस झाले असून राज्यामधील सत्तासंघर्ष अधिक तीव्र झाल्याचे चित्र दिसत आहे. एकनाथ शिंदेंनी आपल्याकडे ४६ आमदारांचा पाठिंबा असल्याचं दावा करत महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे. तर दुसरीकडे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीमधील पक्षांनी शेवटच्या क्षणापर्यंत लढण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

मागील चार दिवसांपासून सुरु असणाऱ्या या सत्तासंघर्षामध्ये आज भाजपानेही उडी घेत महाविकास आघाडी सरकार अंदाधुंद पद्धतीने शासन आदेश जारी करत असल्याची तक्रार थेट राज्यपालांकडे केलीय. एकीकडे शासकीय स्तरावर कुरघोड्या सुरु असतानाच दुसरीकडे बैठकींचं सत्र सुरु असून कार्यकर्तेही रस्त्यावर उतरुन आंदोलन करत आहेत. अशाच एका आंदोलनामध्ये शिवसैनिकांनी एकनाथ शिंदेंच्या बॅनरवर शाई आणि अंडी फेकल्याचा प्रकार नाशिकमध्ये घडलाय.