एकनाथ शिंदे यांची आदित्य ठाकरे व संजय राऊत यांच्या बरोबर बाचाबाची झाल्याचे उघड

0
485

मुंबई, दि. २२ (पीसीबी) – शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंनी स्वत:च्या पक्षाविरोधात बंड पुकारण्याच्या दोन दिवस आधीच एक पक्षांतर्गत वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. एकनाथ शिंदे यांचा राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासोबत शाब्दिक वाद झाला होता. विधान परिषदेच्या निवडणुकीच्याआधी पवईमधील रिनायसन्स हॉटेलमध्ये शिवसेनेच्या आमदारांची रहायची व्यवस्था करण्यात आली होती. याचवेळी एकनाथ शिंदे यांचा आदित्य ठाकरे आणि संजय राऊतांसोबत शाब्दिक खडाजंगी झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

शिवसेनेकडे असणारी अतिरिक्त मतं काँग्रेससाठी वापरण्याच्या मुद्द्यावरुन या नेत्यांमध्ये वाद झाला. शिवसेनेची अतिरिक्त मतं काँग्रेससाठी वापरण्याला शिदेंचा विरोध होता. या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे दुसरे उमेदवार भाई जगताप यांना आवश्यक ती मतं मिळाली आणि ते विजयी झाले. मात्र काँग्रेसचे पहिल्या पसंतीचे उमेदवार चंद्रकांत हांडोरे पराभूत झाले. दहाव्या जागेसाठी काँग्रेस विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष पहायला मिळाला आणि भाजपाने पाच जागा जिंकल्या.

“दोन दिवसांपूर्वी रिनायसेन्स हॉटेलमध्ये वाटाघाटी सुरु होत्या. विधान परिषदेसाठी मतदान कशापद्धतीने केलं जावं याबद्दल चर्चा सुरु होती. याच मुद्द्यावरुन शिंदेंचे राऊत आणि आदित्य ठाकरेंशी मतभेद झाले. शिवसेनेची मतं वापरुन काँग्रेसचा उमेदवार निवडून देण्याच्या कल्पनेला शिंदेंचा विरोध होता. याच मुद्द्यावरुन दोन्ही बाजूकडून जोरदार बाचाबाची झाली. त्या घटनेकडे आज पाहिल्यास याच वादामुळे बंड पुकारण्यात आल्यासारखं वाटतंय,” असं सुत्रांनी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितलं.