एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेणार, भाजपमध्ये धरणीकंप

0
76

मुंबई, दि. 30 (पीसीबी) : महाराष्ट्रात नव्या सरकारच्या स्थापनेबद्दला सस्पेन्स दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. एकीकडे महायुतीचे नेते दिल्लीत अमित शाहांची भेट घेतात, मुंबईत महायुतीची बैठक आयोजित करण्यात येते. आणि दुसरीकडे काळजीवाहू मुख्यमंत्री साताऱ्यातील त्यांच्या गावाता, दरेगावात गेल्याची बातमी समोर येते. यामुळे शुक्रवारची महायुतीची मोठी आणि प्रस्तावित बैठक स्थगित करण्यात आली. यानंतर नव्या चर्चांना उधाण आलं. त्यातच शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी एकनाथ शिंदे यांच्या आगामी निर्णयाबद्दल संकेत देणारं एक वक्तव्य केलं.

मुख्यमंत्री शिंदे यांना जेव्हा एखाद्या मोठ्या निर्णयावर विचारविनिमय करायचा असतो तेव्हा ते आपल्या गावी जातात, उद्या संध्याकाळपर्यंत ते मोठा निर्णय घेतील असं शिरसाट म्हणाले.विलंबामुळे विधानसभा निवडणुकींचा निकाल जाहीर होऊन एक आठवडा उलटला तरी राज्यात अद्याप नवं सरकार स्थापन झालेलं नाही. शिवसेनेच्या सूत्रांच्या सांगण्यानुसार, शुक्रवारी स्थगित झालेली बैठक आका रविवारी मुंबईत आयोजित करण्यात येऊ शकते. तर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या सांगण्यानुसार, विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी ते केंद्रीय निरीक्षकांच्या येण्याची वाट पाहत आहेत.

एकनाथ शिंदे यांनी गुरूवाकी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन नव्या सरकारस्थापनेबाबत चर्चा केली. ही चर्चा सकारात्मक झाल्याचे सांगत शुक्रवारी मुंबईतील बैठकीदरम्यान ही बोलणी पुढे जातील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. मात्र भाजपच्या सूत्रांच्या सांगण्यानुसार, शुक्रवारी महायुतीची कोणतीही बैठक होणार नव्हती. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या नेत्यांनी अमित शाह आणि जेपी नड्डा यांची दिल्लीत भेट घेऊन सत्तावाटपावर चर्चा केली होती

शिंदे उपमुख्यमंत्री बनण्यास तयार नाहीत ?
नव्या सरकारमधील शिंदे यांच्या भूमिकेवरून शिवसेनेत मतभेद निर्माण होत आहेत. काही नेते शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचा सल्ला देत आहेत. पण अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिल्यावर आता ही भूमिका त्यांच्यासाठी उपयुक्त ठरणार नाही, असे काहींचे मत आहे. शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले नाही तर हे पद त्यांच्या पक्षातील अन्य कोणत्या तरी नेत्याकडे जाईल, असे शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी सांगितले.

नवीन सरकारमध्ये शिंदे यांची प्रमुख भूमिका असावी, अशी कार्यकर्त्यांची इच्छा असल्याचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शंभूराज देसाई म्हणाले. तर शिंदे रागावलेले नसून, प्रकृतीच्या कारणामुळे गावी गेल्याचे सामंत यांचे म्हणणे आहे. आता रविवारी बैठक झाली नाही तर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा शक्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने 132, शिवसेनेने 57 आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) 41 जागा जिंकल्या. नव्या सरकारचा शपथविधी पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे. मात्र, सत्तावाटप आणि शिंदे यांच्या भूमिकेवरून सुरू असलेली धुसफूस यामुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडत आहे. महायुतीच्या रविवारी होणाऱ्या प्रस्तावित बैठकीत या दिशेने मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो.