एकनाथ शिंदे महाराष्ट्रा गुन्हेगारी वाढवत आहेत म्हणूनच मी गोळीबार ….

0
355

ठाणे, दि. ३ (पीसीबी) – उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी गोळीबार केला. शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर त्यांनी गोळ्या झाडल्या. या प्रकरणी गणपत गायवाडांसह तिघांना अटक करण्यात आली आहे. तर या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटू लागले आहेत. महेश गायकवाड आणि राहुल पाटील असे दोघे या गोळीबारात जखमी झाले आहेत. अशात गणपत गायकवाड यांनी मी हा गोळीबार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे केला असल्याचं म्हटलं आहे.

“पोलीस स्टेशनच्या दरवाजात माझ्या मुलाला धक्काबुक्की केली. माझ्या जागेचा या लोकांनी (महेश गायकवाड) ताबा घेतला आहे. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात गुन्हेगारांचं राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील तर महाराष्ट्रात फक्त गुन्हेगारच जन्माला येतील. आमच्यासारख्या चांगल्या माणसाला एकनाथ शिंदेंनी आज गुन्हेगार बनवलं आहे. मला मनस्ताप झाला म्हणून मी गोळीबार केला. मी पाच गोळ्या झाडल्या, मला त्याचा काहीही पश्चात्ताप नाही. माझ्या मुलांना जर मारत असतील पोलीस ठाण्यात तर मग मी काय करणार? पोलिसांनी मला पकडलं म्हणून तो (महेश गायकवाड) वाचला. पोलिसांनी हस्तक्षेप केला, मी त्याला जीवे मारणार नव्हतो. पण मी आत्मसंरक्षणासाठी हे पाऊल उचललं. एकनाथ शिंदेंनी असेच गुन्हेगार महाराष्ट्रात पाळले आहेत. एकनाथ शिंदेंचं दुसऱ्यांचं आयुष्य खराब करायला घेतलं आहे.” असं गणपत गायकवाड यांनी झी २४ तास या वृत्तवाहिनीला दूरध्वनीवरुन दिलेल्या प्रतिक्रियेत सांगितलं आहे. तसंच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमुळेच गोळीबार केला असं त्यांचं म्हणणं आहे.

गणपत गायकवाड म्हणाले, “मी वरिष्ठांना अनेकदा तक्रार केली होती. माझा निधी वापरुन काम झालं की श्रीकांत शिंदे हे स्वतः ते काम केल्याचे बोर्ड लावतात. दादागिरी करुन हे होतं आहे. मी राज्य शासनाचा निधी आणला आणि कामं केली तिथे श्रीकांत शिंदेंनी त्यांची कामं म्हणून बोर्ड लावले. माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. एकनाथ शिंदे यांनी त्या भ्रष्टाचारात किती पैसे खाल्ले ते सांगावं. मी दहा वर्षांपूर्वी जागा घेतली होती. त्यांना पैसेही दिले होते. पण ते सही करायला येत नव्हते. त्यामुळे आम्ही कोर्टात गेलो. कोर्टात केस जिंकलो. केस जिंकल्यावर सातबारा आमच्या नावे झाला. मात्र महेश गायकवाड यांनी त्या जागेवर जबरदस्ती कब्जा केला. मी त्यांना विनंती केली होती की तुम्ही कोर्टात जा, जबरदस्ती कब्जा घेऊ नका. कोर्टाने ऑर्डर दिली तर आम्ही जागा देऊ. मात्र त्यांनी दादागिरी काही थांबवली नाही. पोलीस स्टेशनच्या आवारात तो ५०० लोक घेऊन आला होता. माझ्या मुलाला धक्काबुक्की झाली. त्यामुळे गोळीबार केला. मी एक व्यावसायिक आहे, माझ्या मुलांना कुणी गुन्हेगार मारत असतील तर मी काय करणार? माझ्या मुलाला कुणी मारलं तर मी सहन करणार नाही.”

एकनाथ शिंदे भाजपाशीही गद्दारी करणार…
“एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंशी गद्दारी केली आणि भाजपाबरोबरही ते गद्दारी करणार आहेत. माझ्याबरोबरही गद्दारीच केली. एकनाथ शिंदेंकडे माझे कोट्यवधी रुपये आहेत. एकनाथ शिंदे हे देवाला मानत असतील तर त्यांनी सांगावं किती पैसे खाल्ले आहेत, किती बाकी आहेत. कोर्ट निर्णय देईल तो मला मान्य असेल. पण महाराष्ट्रात अशी गुन्हेगारी बंद करायची असेल तर एकनाथ शिंदेंचा राजीनामा घेतला पाहिजे, हे माझं वैयक्तिक मत आहे. एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढवली आहे आणि महाराष्ट्राची वाट लावली आहे. महाराष्ट्र चांगला ठेवायचा असेल तर एकनाथ शिंदेंचा राजीनामा घेतला पाहिजे. अशी माझी विनंती देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही आहे.” असंही गणपत गायकवाड म्हणाले.