एकनाथ शिंदे उद्यानाचे नामकरण आता आनंद दिघे उद्यान..

0
335

पुणे, दि. २ (पीसीबी) – महापालिकेच्या ठरावाला केराची टोपली दाखवत हडपसर परिसरात स्वत:च्या नावे उभारलेल्या उद्यानाचे स्वत:च उद्घाटन करण्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयावर टीका झाल्यानंतर आता उद्यानाचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकनाथ शिंदे उद्यान नव्हे तर धर्मवीर आनंद दिघे उद्यान असे महापालिकेच्या उद्यानाचे नामकरण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याबाबतची घोषणा केली. दरम्यान, सायंकाळपर्यंत सर्व प्रशासकीय मान्यता मिळवून एकनाथ शिंदे यांच्या हस्तेच सायंकाळी उद्घाटन करण्याच्या हालचाली शिंदे गटाकडून सुरू झाल्या आहेत.

महापालिकेच्या मुख्य सभेने केलेल्या ठरावाला केराची टोपली दाखवत शिंदे समर्थक माजी नगरसेवक नाना भानगिरे यांनी हडपसर परिसरातील या उद्यानाला एकनाथ शिंदे उद्यान असे नाव दिले आहे. त्याचे उद्घाटन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’मध्ये मंगळवारी (२ ऑगस्ट) प्रसिद्ध झाले. त्याचे तीव्र पडसाद राजकीय क्षेत्रात उमटले. उद्यानाला दिलेल्या नावावरून टीका झाल्यानंतर उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करण्याची नामुष्की शिंदे यांच्यावर ओढविली. मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर उदय सामंत यांनी स्थानिक माजी नगरसेवक प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांच्याशी संपर्क साधला. या दरम्यान, उद्यानाचे नाव बदलून ते धर्मवीर आनंद दिघे करण्यात येणार असल्याचे उदय सामंत यांनी जाहीर केले.