“एकनाथ शिंदेंना सत्तेत ठेवले हेच मोठे झाले”; बच्चू कडू यांचा खोचक टोला

0
52

मुंबई, दि. 29 (पीसीबी) : विधानसभेतील दारूण पराभावानंतर बच्चू कडू यांनी आज त्यांच्या पदाधिकाऱ्यांची मुंबईत तातडीने बैठक घेतली. मुंबईतील वाय. बी.चव्हाण सेंटर येथे ही बैठक त्यांनी घेतली. संपूर्ण महाराष्ट्रातले जिल्हाप्रमुख आणि उमेदवार यांच्यासह 60 ते 70 लोकांची बैठक घेण्यात आली. यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केले. एकनाथ शिंदे यांना सत्तेत ठेवलं हेच खूप झालं, असा चिमटा त्यांनी काढला. यावेळी त्यांनी अनेक विषयावर त्यांचे मत व्यक्त केले.

बच्चू कडू यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी चांगला कारभार करावा. शेतकर्‍यांची कर्ज माफीची घोषणा करावी. दिव्यांगांचे मानधनांमध्ये वाढ करावी. मला असे वाटते का एकंदरीत जशी लाडकी बहीण आहे त्याचे लाडके शेतकरी करता येईल का? लाडका मजूर करता येईल का? लाडका दिव्यांग करता येईल का? हा विचार करावा, असे कडू म्हणाले.

भाजपा जेव्हा पूर्णपणे सत्तेत येते तेव्हा काय होते, यावर त्यांनी भाष्य केले. एकनाथ शिंदे यांना सत्तेत ठेवले हेच मोठे झाले, असा टोला त्यांनी लगावला आणि भाजपावर निशाणा साधला. एकनाथ शिंदे हे राज्यातच असतील ते केंद्रात जाणार नाहीत असे मत कडू यांनी व्यक्त केले. भाजपा त्यांना गृहमंत्री पद देणार नाही, असे संकेत त्यांनी दिले. भाजपाने त्यांना सत्तेत ठेवले हेच मोठं झाले. भाजपाने तेवढी तरी जाणीव ठेवली आहे, असा टोला त्यांनी लगावला.

चांगली गोष्ट आहे मला वाटतं आता या सगळ्या समीकरणात श्रीकांत शिंदे असेल किंवा प्रफुल पटेल असेल केंद्रामध्ये सुद्धा अस्थिरता निर्माण होऊ नये कदाचित केंद्रात जर गरज राहिली नसती तर आज राज्याचे चित्र वेगळं राहिलं असतं भाजपला केंद्रात पण गरज आहे ना मित्र पक्षाची मित्रपक्ष नाहीतर केंद्रात मग सत्ता ते पण अडचण येऊ शकतात, असे बच्चू कडू म्हणाले.