एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रिपद गेले तरी सरकार पडणार नाही

0
264

नाशिक, दि. २४ (पीसीबी) – संजय राऊत संपादक असून त्यांना याबाबत माहिती असल्याने 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत वक्तव्य केले आहे. जर हे 16 आमदार अपात्र झाले तर एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रिपद जाऊ शकते. मात्र एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रिपद गेले तरी सरकार पडणार नाही, कारण त्यांना 165 आमदारांचा पाठिंबा असणार आहे, असं महत्त्वाचं वक्तव्य छगन भुजबळांनी केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि 16 आमदारांचा विषय चांगलाच गाजत आहे. त्यातच अनेकवेळा सुनावणी होऊनही 16 आमदारांच्या अपात्रतेचा तिढा सुटलेला नाही. त्यातच काल अमरावती येथे शरद पवार यांनी महाविकास आघाडीबाबत महत्त्वाचं वक्तव्य केल्यानंतर राजकीय नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. तत्पूर्वी जळगाव दौऱ्यावर असलेल्या संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरत या सरकारचे डेथ वॉरंट काढल्याचे बोलले होते. त्याचबरोबर येत्या पंधरा दिवसांत हे सरकार कोसळणार असल्याचे ते म्हणाले होते. या सगळ्या प्रश्नावर अनेक राजकीय आपली प्रतिक्रिया देत आहेत.

दरम्यान राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आज नाशिक दौऱ्यावर असून आज त्यांनी माध्यमाशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. छगन भुजबळ यावेळी म्हणाले की, संजय राऊत संपादक आहेत, ते दिल्लीमध्ये काम करत असतात. त्यामुळे त्यांच्याकडे माहिती असेल. शिवाय गेल्या अनेक दिवसांपासून 16 आमदारांबाबत जी केस सुरु आहे. त्याबाबत जर हे 16 आमदार अपात्र झाले तर एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रिपद जाऊ शकतो. एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रिपद गेले तरी सरकार पडणार नाही, कारण त्यांना 165 आमदारांचा पाठिंबा आहे. 16 आमदार अपात्र झाले तरी बहुमताचा आकडा त्यांच्याकडे असल्याने सरकार पडणार असे समीकरण छगन भुजबळ यांनी मांडले आहे.

तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, 2024 मध्ये महाविकास आघाडी एकत्र निवडणुका लढणार की नाही हे आता कसं सांगणार, असं शरद पवार म्हणाले. “अजून आमची आपसात चर्चा झाली नाही, जागावाटप कसं करायचं ते ठरलं नाही, त्यामुळे एकत्र लढणार की नाही हे आता सांगू शकत नाही. एकत्र लढण्याची इच्छा आहे पण फक्त इच्छा पुरेशी नसते,” असंही पवारांनी म्हटलं आहे. यावर भुजबळ म्हणाले की, “शरद पवार मोजून मापून बोलतात. अनेक पक्षांच्या आघाडी होतात आणि त्यात बिघाडी देखील होत असतात.याचा अर्थ महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होईलच असे नाही. शरद पवार महाविकास आघाडी तुटणार असे म्हणाले नाही. कुठल्याही आघाडीमध्ये काही अडचणी येत असतात. त्या अर्थाने ते बोलले, आज तरी आघाडी आहे. त्यामुळे याचा अर्थ असे नाही की ताबडतोब आघाडीमध्ये बिघाडी होईल असे नाही.”