मुंबई, दि. १७ (पीसीबी) – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्यावर कडाडून टीका केली आहे. एवढंच नाही तर राहुल नार्वेकर खोटं बोलत असल्याचे सगळे पुरावे आम्ही दिले आहेत. शिवसेना ही मराठी माणसाची अस्मिता आहे ती पायदळी तुडवण्याचं काम ज्यांनी केलं ते कसले मराठी? असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे. तसंच एकनाथ शिंदेंची शिवसेना म्हणजे पाकिटमारी आहे असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
“उद्धव ठाकरेंनी जे आव्हान दिलंय की जनतेत येऊन सांगा शिवसेना कुणाची ते अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि राहुल नार्वेकर यांनी स्वीकारलं पाहिजे. हिंमत असेल तर जनतेसमोर या, त्यानंतर जो निकाल आहे तो छातीठोकपणे सांगा. तसंच आम्ही जेव्हा पुरावे दाखवले तेव्हा राहुल नार्वेकर बिन काचेचा गॉगल लावून बसले होते का?” असाही टोला संजय राऊत यांनी लगावला.
“जनता न्यायालयाच्या स्क्रिनवर आम्ही सगळे पुरावे दाखवले आहेत. त्यावेळी राहुल नार्वेकर हे बिन भोकांचा चश्मा लावून बसले असतील त्यामुळे त्यांना दिसलं नसेल” असंही संजय राऊत म्हणाले. तसंच पुढची ३० वर्षे भाजपा सत्तेत राहिल यासाठी तयारी करा असं अमित शाह यांनी जे आवाहन केलंय त्यावरही संजय राऊत यांनी टीका केली. “सध्या २०२४ हे वर्ष सुरु झालंय. पुढचे सहा महिने भाजपा टिकली तर मी रामाला अभिषेक करेन” असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
“लोकसभेच्या मुंबईतल्या दोन जागा शिंदे गट लढवेल ती पण कमळाच्या चिन्हावर लढवणार आहे असं मी ऐकतोय. एकनाथ शिंदेंची शिवसेना ही शिवसेनाच नाही. तो सगळा ओढून ताणून केलेला प्रकार आहे. शिवसेना आम्ही आहोत. आम्ही २३ जागा लढतो आहोत. आमची शिवसेना खरी शिवसेना आहे. आत्ताची शिवसेना म्हणजे पाकिटमारी आहे. दुसऱ्याचं पाकिट मारायचं आणि आपल्या खिशात ठेवायचं हे फार काळ टिकणार नाही. मुंबईतल्या शिंदे गटाच्या जागा हे मुंबईतले भांडवलदार आणि गुजरातचे उद्योजक ठरवतील.” असंही संजय राऊत म्हणाले आहेत.










































