भाजपाचे एकेकाळचे खंदे नेतृत्व आणि माजी मंत्री असलेल्या एकनाथ खडसे यांचे २०१९ साली तिकीट कापल्यानंतर त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना विधानपरिषदेवर संधी देऊन सन्मानितही केले. मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ खडसे स्वगृही परतत आहेत. खुद्द एकनाथ खडसे यांनीच तसे संकेत दिले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा पक्षांतराची चर्चा होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि जळगावमधील एरंडोल-पारोळा विधानसभेचे माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांनी खडसे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तसेच खडसेंना घेऊन चूक केली, अशी कबूली खुद्द शरद पवार यांनी दिल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
जळगाव येथे माध्यमांशी बोलत असताना माजी आमदार सतीश पाटील यांनी अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. ते म्हणाले, “दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी पुण्यामध्ये जळगावमधील नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत सदर गोष्ट चर्चेला आली. त्याचवेळी मी शरद पवार यांना सांगितले की, खडसेंना पक्षात घेण्यासाठी मी विरोध केला होता. त्यासाठी तुमच्याशी अर्धा तास भांडलो. तरीही तुम्ही माझे म्हणणे न मानता त्यांना पक्षात घेतलं आणि आमदार केलं. त्यावेळी तुम्ही आमचे ऐकलं असतं, तर आज आपल्याला रावेरमध्ये उमेदवार शोधण्यासाठी फिरावं लागलं नसतं. त्यानंतर शरद पवार यांनी माझ्याशी बोलताना ‘खडसे यांना घेऊन चूक झाली’ हे मान्य केले.”