एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीचा पाठलाग

0
186

पिंपरी, दि. २० (पीसीबी) – एकतर्फी प्रेमातून तरुणाने अल्पवयीन मुलीचा पाठलाग केला. तो गुंड असून जेलमध्ये जाऊन आला आहे. त्यामुळे त्याचे कोणीही काहीही करू शकत नाही, असे मुलीला सांगत तिच्याशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. हा प्रकार ऑक्टोबर 2021 ते 16 ऑक्टोबर 2022 या कालावधीत पिंपरी मार्केट येथे घडला.

राहुल उर्फ गब्बर इंगवले (रा. काळेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 17 वर्षीय पीडित मुलीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलगी मागील वर्षी पिंपरी मार्केट मधील एका कपड्याच्या दुकानात काम करत होती. त्यावेळी आरोपीने दुकानात येऊन फिर्यादीकडे प्रेमाची मागणी केली. मात्र फिर्यादीने नकार दिला. त्यानंतर देखील आरोपीने मुलीचा वारंवार पाठलाग केला. तिच्या आई वडिलांनी आरोपीला समजावून सांगितले असता त्यांनाही शिवीगाळ केली. मी काळेवाडी मधला गुंड आहे. मी जेलमध्ये जाऊन आलो आहे. त्यामुळे माझे कोणीच वाकडे करणार नाही, अशी आरोपीने धमकी दिली. 16 ऑक्टोबर रोजी फिर्यादीस त्यांच्या आईने पिंपरी येथे बोलावले असल्याने त्या जात असताना आरोपीने रस्त्यात अडवून त्यांच्याशी गैरवर्तन करून विनयभंग केला. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.