ऋतुजा लटके यांची उमेदवारी अडचणीत आल्यास शिवसेनेचे प्लॅन बी तयार

0
262

मुंबई, दि. १२ (पीसीबी) : अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीमध्ये होणाऱ्या विधानसभा पोटनिवडणुकीत आता नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. शिवसेनेचे दिवगंत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी उमेदवारी दिली आहे. मात्र, त्या मुंबई महापालिका कर्मचारी असलेल्या ऋतुजा लटकेंचा राजीनामा अद्याप मंजूर झालेला नाही. त्यामुळे त्यांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामुळे शिवसेना ठाकरे गटाने आणखी एक पर्यायी उमेदवार देण्याची रणनीती आखलल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी येत्या १४ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. या मुदतीत ठाकरे गटाकडून आणखी एक किंवा दोन उमेदवार डमी म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. लटकेंच्या राजीनाम्यावरून कायदेशीर पेच निर्माण झाला असल्यामुळे त्यांची उमेदवारी धोक्यात आली तर डमी उमेदवारापैकी एकाची ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली जाईल, अशी चर्चा आहे.

पोटनिवडणुकीत ठाकरे गटाचे पर्यायी उमेदवार म्हणून अनिल परब यांचे निकटवर्तीय व मातोश्रीचे विश्वासू माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे नाव पुढे येत आहे. तर दुसरीकडे राजीनामा मंजूर करावा यासाठी ऋतुजा लटके या महापालिका मुख्यालयात ठाण मांडून बसल्या होत्या. त्यांच्या या कृतीमुळे त्यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी कारवाई होऊ शकते, अशी चर्चा पालिका वर्तुळात आहे.
पत्रकार परिषदेमध्ये बोलतानाही, विश्वनाथ महाडेश्वर यांनी सूचक वक्तव्य केले होते. ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर झाला नाहीतर बी प्लॅन तयार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. बी प्लॅन तयार ठेवावाच लागतो, असेही त्यांनी सांगितले होते. त्यामुळे आता ठाकरे गटाचा उमेदवार कोण असणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

ऋतुजा लटके शिंदे गटात जाणार की काय अशी चर्चा सुरु झाली होती. यावर लटके यांनी फेसबुक पोस्ट करून आपली भूमिका स्पष्ट केली. आम्ही सदैव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असल्याचे त्यांनी सांगितले होते. सोबत त्यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा फोटो शेअर केला होता. तसेच मी एकनिष्ठ आहे, मी अंधेरीची पोटनिवडणूक लढली तर ती मशाल या चिन्हावरच लढेन, असेही त्यांनी स्पष्ट केले.