ऋतुजा लटकेंचा राजीमाना मंजूर न होण्यामागे शिंदे गटाचा दबाव – अनिल परब

0
232

मुंबई, दि. १२ (पीसीबी) -शिवसेना आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी पूर्वच्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून ऋतुजा लटके यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. मात्र, त्या मुंबई मनपाच्या कर्मचारी असल्याने त्यांचा राजीमान अद्यापही मंजूर झालेला नाही. त्यामुळे त्यांची उमेवारी धोक्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, यावरून ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटावर गंभीर आरोप केले आहेत. ऋतुजा लटकेंचा राजीमाना मंजूर न होण्यामागे शिंदे गटाचा दबाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच त्यांना शिंदे गटात खेचण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही ते म्हणाले.

आम्ही त्यांच्या पत्नी ऋतुजा लटकेंना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. त्या मुंबई मनपाच्या कर्मचारी असल्याने त्यांनी २ सप्टेंबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला. मात्र, मुंबई मनपा प्रशासनाकडून त्यांचा राजीनामा उद्यापही मंजूर झालेला नाही. त्यांचा राजीनामा मंजूर होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनावर दबाव आणल्या जात आहे”, असा आरोप अनिल परब यांनी केला आहे.

“आम्ही जेव्हा ऋतुजा लटकेंना उमेदवारी देणार असल्याचे सांगितले, त्यानंतर त्यांनी २ सप्टेंबर रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. एक महिन्यानंतर जेव्हा त्या राजीनामा आणण्यासाठी गेल्या, तेव्हा त्यांनी चुकीच्या पद्धतीने राजीनामा दिला असल्याचे मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यानंतर त्यांनी ३ ऑक्टोबर रोजी पुन्हा राजीनामा दिला. नियमानुसार कोणत्याही कर्मचाऱ्याला राजीनामा देताना एक महिनाआधी सुचना द्यावी लागते. अन्यथा एका महिन्याचा पगार कोषागारात जमा करावा लागतो. मात्र, ऋतुजा लटके यांचे ३० दिवस पूर्ण होत नसल्याने त्या पैसे भरण्यास तयार आहेत, तरीही त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आलेला नाही. मी स्वत: मनपा आयुक्तांशी याबाबत बोललो. ते केवळ टोलवाटोलवीची उत्तरं देत आहेत”, असेही ते म्हणाले.

ऋतुजा लटकेंचा राजीमाना मंजूर न करून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच त्यांना शिंदे गटात खेचून त्यांना मंत्रीपदाचे आमीष दिल्या जात असल्याचा आरोपही अनिल परब यांना केला आहे. याबाबत न्यायालयात दाद मागणार असल्याचेही ते म्हणाले.