भोसरी, दि. 14 (पीसीबी)
उसने दिलेले पैसे परत मागितल्याने मित्राने मित्राला बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 12) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास खंडेवस्ती चौक भोसरी येथे घडली.
अमित महादेव घाटे (वय 36, रा. खंडेवस्ती, भोसरी) असे जखमी मित्राचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कुमार काटे (वय 36, रा. खंडेवस्ती भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अमित घाटे यांनी त्यांचा मित्र कुमार काटे याला हातउसने पैसे दिले होते. ते पैसे अमित यांनी परत मागितले. त्या कारणावरून कुमार काटे याने अमित यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. तसेच लाकडी दांडक्याने अमित यांच्या डोक्यात, पाठीवर आणि कपाळावर मारून त्यांना जखमी केले. परत पैसे मागितले तर तुला बघून घेईन, अशी धमकी देखील दिली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.