उर्मिलाच्या कारनं दोन मजुरांना धडक, एक ठार

0
9

मुंबई, दि. २8 (पीसीबी) : मराठी सिनेइंडस्ट्रीतली लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला कोठारे हिच्या कारचा भीषण अपघात झाल्याचं समोर आलं आहे. उर्मिलाच्या कारनं दोन मजुरांना धडक दिल्याची माहिती आहे. तर या धडकेत एका मजुराचा मृत्यू झाल्याचंही समोर आलं आहे. तर उर्मिला देखील अपघातात जखमी असल्याचं म्हटलं जात आहे.

कुठे घडला अपघात?
मुंबईतल्या कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ ही घटना घडल्याची माहिती आहे. रस्त्यावर मेट्रो कामगार काम करत असताना उर्मिलाच्या कारनं त्यांना धडक दिली. यात एका मेट्रो मजुराचा जागीच मृत्यू झाला असून, दुसरा मजूर गंभीर जखमी आहे. शूटिंगवरून परत येत असताना हा अपघात घडला. उर्मिलाचा ड्रायव्हर कार चालवत होता. ड्रायव्हरचे गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. पोईसर मेट्रो स्टेशनजवळ हा अपघात घडला. मेट्रोच्या दोन मजुरांना कारनं धडक दिल्यानं एका मजुराचा मृत्यू झाला आहे, पोलिसांनी उर्मिलाच्या ड्रायव्हर विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

एअर बॅगमुळे वाचला जीव
तर कारमधील एअर बॅग वेळेत उघड्यानं उर्मिलाचा जीव वाचल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे. हा अपघात इतका भीषण होता की, तिच्या कारचा चक्काचुर झाला आहे. उर्मिलाच्या तब्येतीविषयी आणखी माहिती मिळू शकली नाहीये. उर्मिलाच्या अपघातानं चाहत्यांना धक्का बसला असून, चाहत्यांनी तिच्या तब्येतीविषयी चिंता व्यक्त केली आहे.