उरण तालुक्यात मनसेला‌ खिंडार; सोनारीमध्ये असंख्य पदाधिकाऱ्यांनी हातावर बांधले शिवबंधन

0
165

दि ३० एप्रिल (पीसीबी ) – उरण – मावळ लोकसभा मतदारसंघातील उरण तालुक्यात मनसेला मोठे खिंडार पडले आहे. तालुक्यातील सोनारी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शाखा अध्यक्ष सुरेश चंद्रकांत कडू, माजी शाखा खजिनदार अमर हरीचंद्र पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि.30) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे.

पक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर यांनी नेतृत्वावर विश्वास ठेवत मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी इंजिन सोडून हातात मशाल घेतली आहे. मनोहर भोईर यांच्या हस्ते सुरेश कडू व अमर पाटील यांना शिवबंधन बांधून व भगवी शाल देऊन त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. या वेळी माजी सरपंच रोहिदास पाटील, उपसरपंच मेघशाम कडू, शाखाप्रमुख हरीचंद्र कडू,ए शाखाप्रमुख दीनेश पाटील, किशोर कडू, किशोर कडू, रमाकांत कडू, विराज सुरेश कडू, किशोर कडू, हितेश म्हात्रे, सुचित कडू तसेच, उपतालुका संघटक कृष्णा घरत, केगाव तांबोळी, डोंगरी गावचे सचिन पाटील, अनंत घरत व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

प्रवेशाबाबत मनोहर भोईर म्हणाले की, मनसेने भाजपसोबत जाणे अनेक प्रामाणिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना पटलेले नाही. त्यामुळे त्यांच्यात प्रचंड खडखद आहे. नाराज मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मनसेला राम राम करीत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्पष्ट विचार आणि ध्येय – धोरणे ते स्वीकारत आहेत. ते पदाधिकारी मावळ लोकसभेचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांचा प्रचार करणार असून उरण तालुक्यात सर्वत्र शिवसेनेची मशाल‌ पोहोचत आहे.