उमेदवार कोण ते महत्वाचे नाही, तर मोदीजी महत्वाचे…

0
418

-पिंपरी चिंचवड भाजपमधील बंड शमले, प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनीच लावला चाप

मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीमधील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना विरोध कऱणाऱ्या पिंपरी चिंचवडमधील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चाप लावला. उमेदवाराचा प्रचार कऱणार नाही, अशी भाषा कऱणाऱ्यांना कठोर शब्दांत त्यांनी तंबी दिली. महायुतीमध्ये उमेदवार कोणत्या पक्षाचा, कोण आहे त्याच्याशी काही मतलब नाही. आपल्याला नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करायचे हे लक्षात घ्या. प्रत्येक बूथवर महायुतीच्या उमेदवाराला ५१ टक्के मतदान झालेच पाहिजे अन्यथा निकालानंतर त्या-त्या बूथ प्रमुख आणि वॉरियर्सची गंभीर दखल घ्यावी लागेल, असा निर्वानीचा इशाराच प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दिला.

मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे प्रदेश पदाधिकारी, खासदार-आमदारांसह विधानसभा आणि लोकसभा निवडणूक प्रमुख, जिल्हाध्यक्ष, मंडलाध्यक्ष, सर्व आघाड्यांचे प्रमुख, सुपर वॉरियर्स, शक्तिकेंद्र प्रमुख आणि बूथ प्रमुखांचा एक झूम मिटींग सायंकाळी घेण्यात आली. आमदार आश्विनी जगताप, महेश लांडगे, प्रशांत ठाकूर, महेश बाल्दी, उमा खापरे, माजी खासदार अमर साबळे, माजी मंत्री बाळा भेगडे, महेश बाल्दी, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकरशेठ जगताप, जिल्हाध्यक्ष शरद बुटे पाटील, रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिरूर लोकसभा प्रमुख योगेश टिळेकर यांच्यासह ९८८ बूथ प्रमुख उपस्थित होते. दरम्यान, बावनकुळे यांच्या इशाऱ्यामुळे पिंपरी चिंचवड शहर कार्यालयातील बैठकित बंडखोरीचा भाषा करणाऱ्या आणि विधानसभेचा शब्द मागणाऱ्या पदाधिकाऱ्यांची बोलतीच बंद झाली आहे.

आपल्या निवेदनात बावनकुळे यांनी महायुतीत काही तडजोडी कराव्या लागतात असे सांगून, प्रत्येक बूथवर महायुतीच्या उमेदवाराला ५१ टक्के मतदान झालेच पाहिजे यासाठी पुढचे ४० दिवस प्रयत्न करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, महायुतीचा उमेदवार विजयी कऱण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. मतदारांना घरोघरी जावून अगदी लग्न पत्रिका असल्यासारखे आपुलकिने नियमंत्रण द्यायचे आणि मतदानासाठी विनंती करायची आहे. लोकसभा निकालानंतर दोन महिन्यांत विधानसभा आणि पाठोपाठ महापालिका निवडणुका आहेत. महायुती उमेदवाराचेच बटन दाबायचे आहे हे लक्षात असू द्या. कोणत्या पक्षाला तिकीट दिले हे आज महत्वाचे नाही, तर मोदी पंतप्रधान होतील याला महत्व आहे. पद हे शोभेसाठी दिलेले नाही, तर ५१ टक्के मते मिळविण्यासाठी दिलेले आहे. तुम्ही जर ते करू शकले नाहीत तर कठिण आहे. कोणी किती काम केले ते ४ जूनला मला समजणार आहे. एकही बूथ कमजोर असू नये. जर का कमी मते मिळाली तर, मला त्या बूथप्रमुखाला नको ते पत्र दुःखाने द्यावे लागेल. हा दिवस येऊ द्यायचा नाही तर कामाला लागा, असे आवाहन बावनकुळे यांनी केले.

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठीच्या काही क्लुप्त्या त्यांनी सांगितल्या. ते म्हणाले, पुढच्या दीड महिन्यांत येणाऱ्या सण, समारंभ, पुण्यतिथी, जयंती ही एक संधी समजून काम करा. १ मे च्या कामगार दिनाला संघटित असंघटित कामगारांना एकत्र करून त्यांचा सन्मान करा. मोदी सरकारच्या विविध २७ योजना लोकांना सांगा. मोदीजीच का ते लोकांना समजून सांगा.