उमेदवार कुठे पाडायचे, कुठे उभे करायचे? जरांगे पाटलांनी सांगितलं विधानसभेचं प्लॅनिंग

0
60

अंतरवाली सराटी, दि. 20 (पीसीबी) : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाची महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीला हजारोंच्या संख्येनं मराठा बांधव उपस्थित होते. मनोज जरांगे पाटील निवडणुकीबाबत काय निर्णय घेणार? उमेदवार उभे करणार की पाडणार याबाबत सर्वांनाच मोठी उत्सुकता होती. या बैठकीकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. अखेर मनोज जरांगे पाटील यांनी या बैठकीमध्ये मोठी घोषणा केली आहे.

जिथे आपले उमेदवार निवडून येऊ शकतता तिथे उमेदवार उभे करा. जिथे उमेदवार निवडून येण्याची शक्यता नाही अशा ठिकाणी जे उमेदवार लिहून देतील की आम्ही मराठा आरक्षणाला पाठिंबा देऊ त्यांना निवडून आणा. जे लिहून देणार नाही त्यांना पाडा. एस्सी आणि एसटी उमेदवारांच्या विरोधात उमेदवार देऊ नका. जो आपला विचाराचा उमेदवार असेल त्याला लाखभर अधिक मतं देऊन निवडून आणा, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, कोणत्या मतदारसंघामधून आपण निवडणूक लढवायची आणि कोणत्या मतदारसंघात पाडायचं हे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये सांगतो. तुम्ही सगळ्या 288 मतदारसंघात अर्ज भरून ठेवा. मी समीकरण जुळवत आहे. ऐनवेळी ज्या उमेदवाराला अर्ज मागे घ्यायला सांगितला जाईल त्याने आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा. जर मागे घेतला नाही तर तो पैसे घेऊन आपल्या विरोधात उभं राहिला आहे असं मानलं जाईल असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, पक्षाकडून आणि नेत्यांकडून बोलायचं बंद करा माझ्या समाजाचं काय होईल हे डोळ्यापुढे धरा. मला वाटतं आपण एक काम करावं माझं आंदोलन आणि माझा समाज महत्त्वाचा आहे. मी फक्त 30 ते 40 दिवस राजकारणाचा त्यानंतर पुन्हा सगळ्या समाजाचा, मला हात वर करून वचन द्या मला तुम्ही उघडं पडू देणार नाही. काही यश अपयश आलं तर तुम्ही खचून जाऊ नका, माझा विश्वासघात होऊ देऊ नका असंही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी बैठकीसाठी उपस्थित मराठा बांधवांना म्हटलं आहे.