उमेदवाराचे नाव जाहीर करा म्हणताच जयंत पाटील संतापले; भाषण सोडून…..

0
72

अकोले, दि. 25 (पीसीबी) : सध्या महायुती आणि महाविकास आघाडीत चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. सर्वच पक्ष विधानसभेच्या तयारीला लागले आहेत. जागा वाटपाची खलबतं सुरू आहे. अनेक मतदारसंघात तीनही पक्षांनी दावा केलेला आहे. त्याठिकाणी उमेदवार ठरलेला नाही, अशी स्थिती असताना जयंत पाटील यांच्यासमोर अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील सभेत मोठा पेचप्रसंग उभा ठाकला. मग काय जयंत पाटील यांचा पारा चढला आणि त्यांनी कार्यकर्त्याला झाप झाप झापून काढले.

राष्ट्रवादी शिवस्वराज्य यात्रा आज अकोले येथे पोहचली. त्यावेळी मंचावर सर्वच प्रमुख नेते होते. जयंत पाटील हे भाषणासाठी उभे राहताच अकोले विधानसभेसाठी उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्याची मागणी गर्दीतून एका कार्यकर्त्यांने केली. भाषणाच्या सुरुवातीलाच उमेदवाराचे नाव जाहीर करण्याची मागणी केल्याने जयंत पाटलांचा संताप झाला. जयंत पाटील भाषण सोडून मागे फिरले. अमित भांगरे , जिल्हाध्यक्ष संदिप वर्पे यांनी विनंती केल्यानंतर जयंत पाटील यांनी भाषणास सुरूवात केली.

मी फक्त येथे फक्त उमेदवाराची घोषणा करण्यासाठी आलो नाही, असे पाटील यांनी कार्यकर्त्याला फटकारले. त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना शिस्त पाळण्याच्या सूचना केल्या. 1 तारखेला महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब होणार आहे. आम्हाला आघाडी टिकवायची आहे. त्यामुळे आज उमेदवाराची घोषणा करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

भाषण सुरू असताना घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्याला अकोलेचा उमेदवार कोण आहे हे अजूनही कळत नसेल तर त्याच्या बुद्धीची कीव येते, असा खरमरीत टोला त्यांनी लगावला. त्यांनी यावेळी अमित भांगरे यांच्या नावाची घोषणा केलेल्या कार्यकर्त्याला टोला देत नाव न घेता उमेदवारी जाहीर केल्याची चर्चा रंगली. सध्या श्राद्ध पक्ष सुरू आहे. घट बसल्यावर मुहूर्त आहे उमेदवार घोषणा तेव्हाच होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. आपण कुठेच उमेदवार घोषित केला नाही. जामनेरमध्ये एक नवीन नेते भाजपमधून आपल्या पक्षात आले. पण त्यांचंही नाव जाहीर केले नाही. मी फक्त भाषणात सांगितले की, त्यांच्या हातात तुतारी दिलेली आहे. कारण आपण उमेदवाराची घोषणा करु शकत नाही, असे ते म्हणाले.