उमा खापरे यांना `आमदारकी`

0
408

पिंपरी, दि. ८ (पीसीबी) – राज्यात विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी निवडणुका होणार आहेत. त्यापैकी पाच जागांसाठी भाजपाने आपली नावे निश्चित केली आहेत. प्रदेश महिला अध्यक्षा उमा खापरे, विधान परिषदेतील विरोधी नेते प्रविण दरेकर, मावळते आमदार प्रसाद लाड, माजी मंत्री राम शिंदे आणि भाजपाचे प्रदेश संघटन सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांची नावे निश्चित केली आहेत.

दरेकर आणि लाड यांनी दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे, तर राम शिंदे हे विधानसभेला कर्जत जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादीचे रोहित पवार यांच्याकडून पराभूत झाले होते म्हणून त्यांनी परिषदेवर संधी देण्यात आली आहे. खापरे आणि भारतीय यांना प्रथमच संधी मिळाली आहे. पंकजा मुंडे आणि चित्रा वाघ यांना डावलून खापरे यांना संधी मिळाल्याबद्दल भाजपा वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कोण आहेत उमा खापरे –
उमा खापरे या पिंपरी चिंचवड महापालिकेत दोन वेळा भाजपाच्या नगरसेविका होत्या २००१-०२ मध्ये त्या विरोधीनेत्या होत्या. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या अत्यंत निष्ठावंत सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे. प्रदेश भाजपा कार्यकारणीत गेली २० वर्षे त्या विविध पदांवर कार्यरत आहेत. अत्यंत आक्रमक शैली असल्याने त्यांना संधी मिळाली आहे. भापाच्या वतीने महाआघाडी सरकार विरोधात त्यांनी राज्यभर जोरदार आंदोलने केली आहेत. शिवसेनेच्या दीपाली सैय्यद यांच्या विरोधात थेट पोलिस तक्रार करणाऱ्या रणरागीनी म्हणून त्यांचे नाव झाले.

श्रीकांत भारतीय निष्ठावंत भाजपीय –
भाजपाचे जेष्ठ नेते संघटन सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांची ओळख सर्वदूर आहे. भाजपामध्ये अत्यंत अभ्यासू, निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून श्रीकांत भारतीय यांचे नाव घेतले जाते. भाजपाचे राज्य सरकार असताना तेव्हाचे मुख्यमंत्री आणि आताचे विधान परिषदेचे विरोधी नेते देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी म्हणून सलग पाच वर्षे त्यांनी काम पाहिले. सामाजिक कार्यात त्यांचे योगदान मोठे आहे.