उमा खापरेंना `लॉटरी`, राष्ट्रवादी काही शिकणार का ? – थर्ड आय – अविनाश चिलेकर

0
500

राजकारणात कधी कोणाचे नशिब फळफळेल ते सांगता येत नाही. काही मंडळींना आयुष्य खर्ची घालून आमदारकी, खासदारकी काय साधे नगरसेवकपदसुध्दा पदरी पडत नाही. दुसरीकडे काही कार्यकर्त्यांना निष्ठेचे फळ कधी त्यांना स्वप्नातही कल्पना केली नसेल असे मिळते. भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांच्याबाबतीत अगदी तसेच झाले. मनीध्यानी नसतानाही पंकजा मुंडे, चित्रा वाघ यांच्यासारख्या रथी महारथींना डावलून उमाताईंना विधान परिषदेच्या आमदारकीची संधी मिळाली. अक्षरशः लॉटरीच लागली म्हणा. आता कोण उमा खापरे, त्यांना का व कशी संधी मिळाली यावर राजकिय वर्तुळात चर्वीतचर्वण सुरू आहे. ते काही असो, खापरे आमदार झाल्यात जमा आहे. भाजपाला आणि विशेषतः पिंपरी चिंचवडकरांना त्याचा विशष आनंद आहे. कारण खापरे यांची राजकिय कारकिर्द शहरातून सुरू झाली. गोपीनाथ मुंडे यांच्या अत्यंत निष्ठिवंत अशी त्यांची मूळची ओळख. दोन वेळा नगरसेवक झाल्या. महापालिकेत विरोधी नेत्या होत्या आणि सलग २० वर्षे भाजपाच्या प्रदेश कार्यकारणीत विविध पदांवर कार्यरत आहेत. भाजपा महिला प्रदेशाध्यक्षा म्हणून त्यांना संधी मिळाली. कायम मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहणाऱ्या पकजा मुंडे यांचा पत्ता देवेंद्र फडणवीस यांना कट करायचाच होता. पर्यायी नाव खापरे यांचे समोर आले आणि लॉटरी लागली. खापरे यांच्या मुळे पिंपरी चिंचवड शहर भाजपाला ताकद मिळाली. खरे तर, खापरे या काय मास लिडर नाहीत. शहर पातळीवर त्या कधीही विशेष कार्यरत नव्हत्या. उद्या महापालिकेला त्यांच्यामुळे २०-२५ नगरसेवकांचे संख्याबळ वाढणार असेही नाही. स्वतः पंकजा मुंडे यांना नाही पण मुंडे गटाच्या खापरे यांना संधी दिली इतकेच म्हणता येईल. पिंपरी चिंचवडला आगामी महापालिका निवडणुकिसाठी भाजपाल शहरात तिसरा आमदार मिळाला, ही एक जमेची बाजू. यापूर्वी चिंचवड विधानसभा मतदारसंघातून लक्ष्मण जगताप आणि भोसरीतून महेश लांडगे आमदार आहेत. २०१७ मध्ये त्यांनीच महापालिकेत भाजपाची सत्ता आणली. खापरे यांना आमदारकी देऊन भाजपाने पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसलाही एक संदेश दिला आहे.

राष्ट्रवादीने शहराल किती पदे दिली –
पिंपरी चिंचवड शहराच्या विकासात राष्ट्रवादीचे म्हणजेच शरद पवार व अजित पवार यांचे योगदान मोठे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला पिंपरी चिंचवडकरांनी सलग २० वर्षे निर्विवाद सत्ता दिली. त्या तुलनेत शहरातील राष्ट्रवादीच्या नेत्यांना कोणती पदे मिळाली, हा प्रश्न आहे. भाजपाची २०१७ मध्ये शहरात सत्ता आली. देवेंद्र फडणवीस यांनी शहरात पाय रोवण्यासाठी महत्वाच्या पदांची अक्षरशः बरसात केली. अमर साबळे या मुंडे समर्थकाला रात्रीतून राज्यसभेची खासदारकी मिळाली. मागासवर्गीयांचे प्रतिनिधीत्व करणारा चेहरा शोधताना साबळे यांचे नाव समोर आले आणि त्यांना अचानक राज्यसभेची लॉटरी लागली. मुंडे समर्थक वंजारी समाजातील सदाशिव खाडे यांना पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण अध्यक्षपद मिळू नये म्हणून भाजपाचेच आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासह अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते, पण फडणवीस यांनी खाडे यांनाच ते पद दिले. मातंग समाजातील अमित गोरखे या युवकाला ३००० कोटींचे बजेट असलेल्या अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्षपद बहाल केले. चंद्रकांत पाटील यांचे खंदे समर्थक सचिन पटवर्धन यांना राज्य लोकलेखा समिती अध्यक्षपद सलग दोनवेळा मिळाले. अशा प्रकारे भाजपाचे सरकार असताना केवळ महापालिकेत सत्ता आली म्हणून या शहरात तीन-तीन राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेली पदे भाजपाने दिली. ज्यांना पदे मिळाली त्यांचा जनाधार फार मोठा आहे असेही नाही, पण भाजपाने जाण ठेवली. पद देताना तुझ्याकडे किती लोक, पत, पैसा आहे ते कधीही विचारले नाही. त्यामुळे तिथे भाजपाला पार्टी वुथ डिफरन्ट म्हणता येते. आता ज्यांना परिषदेवर संधी मिळाली त्या खापरे किंवा पूर्वी राज्यसभेवर संधी देण्यात आली ते साबळे हे प्रतिकूल परिस्थितीतून वर आलेले साधे कार्यकर्ते. त्यांच्या आयुष्याचे सोने भाजपाने केले. गाडी, कार्यालय, निधी पासून सगळे भाजपाने पुरवले. आता भाजपा बरोबर राष्ट्रवादीची त्याच संदर्भात तुलना होणार आहे. कारण शरद पवार साहेब किंवा अजितदादांनी त्याबाबतीत शहरावर खरो खर अन्याय केला, असे म्हणावे लागेल.

राष्ट्रवादीकडे तोडस तोड असे नेते, कार्यकर्ते आहेत, पण त्यांपैकी एकालाही आजवर कधीही राज्यसभा, विधान परिषद किंवा राज्यातील एखादे महामंडळ मिळाले नाही. तेच शिवसेनेचे आहे. शिवसेनेला शहराने दोन-दोन खासदार दिले, पण शहरासाठी शिवसेनेने काय केले तर उत्तर झिरो येते. राष्ट्रवादीचे आझमभाई पानसरे यांनी आयुष्य खर्ची घातले. मोठा जनाधार असूनही केवळ मुस्लिम असल्याने त्यांचा लोकसभेला आणि नंतर विधानसभेलाही पराभाव झाला. खरे तर, त्यांना विधान परिषद देऊन झालेले नुकसान भरून काढता आले असते. राष्ट्रवादीने बेरजेच्या राजकारणात कायम पुणे शहराला झुकते माप दिले. राज्यसभेवर पुणे शहराच्या माजी महापौर म्हणून वंदना चव्हाण यांना राष्ट्रवादीने संधी दिली होती, पण विधान परिषदेसाठी पिंपरी चिंचवडच्या माजी महापौर मंगला कदम यांची क्षमता असूनही विचार झाला नाही. पंजाबी समाजाचे प्रतिनीधी असूनही बहुजनांत मोठा जनाधार असलेले योगेश बहल सलग ६ वेळा नगरसेवक झाले, पण त्यांना आमदारकी किंवा महामंडळ द्यावे असे अजितदादांनाही वाटले नाही. लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांनी वाऱ्याची दिशा ओळखून पवारांचा हात सोडून आणि भाजपामध्ये गेले त्यांच्या आयुष्याचे सोनं झाले. माजी आमदार विलास लांडे विधानसभेला पराभूत झाल्यानंतर विधान परिषेसाठी वारंवार प्रयत्न करतात पण त्यांना संधी मिळत नाही. दिवंगत नेते नाना शितोळे यांनी पवार साहेबांचे शहरातील सर्व राजकारण सांभाळले, पण त्यांच्याही पदरी अखेरी निराशाच आली. माजी महापौर संजोग वाघेरे, तात्या कदम अशी किमान दहा-पंधरा मुरब्बी नेत्यांची नावे घेता येतील. पवार यांच्यावर जीवापाड प्रेम केलेल्या पिंपरी चिंचवडमधील नेत्यांची अवस्था बोन्साय प्लॅन्ट सारखी झाली. लायकीचे अनेक नेते होते, पण कोणी डोईजड नको म्हणून त्यांना पिंपरी चिंचवडच्या बाहेर कधी येऊ दिले नाही. भाजपाने मात्र तळागाळातील कार्यकर्त्याच्या पंखात बळ दिले. त्यांचा पक्षाला फायदा तोटा याचे गणित कधी मांडले नाही.

शिवसेनेनेसुध्दा राज्यात दोन वेळा सत्ता होती, पण पिंपरी चिंचवडला एक छदाम दिला नाही. दिवंगत गजानन बाबर आमदार व नंतर खासदार झाले. श्रीरंग बारणे हे दोनदा खासदार झाले. पिंपरीतून गौतम चाबुकस्वार यांना आमदारकी होती. शिवसेनेला अशा प्रकारे शहरातून बळ मिळाले, पण सेनेनेही पदांचे वाटप करताना मुंबईचाच विचार केला. बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक बाजीराव लांडे पाटील, दत्ता गायकवाड, महादेव गव्हाणे, दिवंगत बाबा धुमाळ, राम उबाळे अशा मंडळींनी आयुष्याची राखरांगोळी केली पण संघटनेशिवाय मोठे पद त्यांना मिळाले नाही. शिवसेनेत असताना सिमा सावळे आणि सुलभा उबाळे या दोन रणगारिनींची ओळख शहराला होती. भाजपाच्या उमाताई खापरे यांच्याच दोघीही मैत्रिणी. सावळे आणि उबाळे यांचा जनसंपर्क, अभ्यास, कार्यशैली तशी उमाताई खापरे यांच्या तुलनेत कित्येत पटीने उजवी आहे. पण आमदारकी साठी नशिबाची साथ खापरे यांना मिळाली. भाजपाने शहराला किती पदे दिली आणि राष्ट्रवादी किंवा शिवसेनेने किती दिली याची आता तुलना होणार. तिथे पारडे भाजपाकडे झुकते आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आतातरी हे लक्षात घेतील, अशी अपेक्षा करु या.