‘उपेक्षित कामगारांच्या स्वेदगंगेचा सन्मान झाला पाहिजे!’ – प्रा. डाॅ. राजा दीक्षित

0
2

पिंपरी, दि. ३० ‘कामगार चळवळ अतिशय क्षीण झाली असून कंत्राटी आणि असंघटित कामगार आपला लढा कसा देणार हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे उपेक्षित कामगारांच्या स्वेदगंगेचा सन्मान झाला पाहिजे!’ असे विचार महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष प्रा. डाॅ. राजा दीक्षित यांनी ऑटोक्लस्टर सभागृह, जुना मुंबई – पुणे महामार्ग, चिंचवड येथे मंगळवार, दिनांक २९ एप्रिल २०२५ रोजी व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय कामगारदिन आणि महाराष्ट्र राज्याच्या स्थापनादिनानिमित्त नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी आयोजित तेहतिसाव्या श्रम – उद्योग परिषदेत विविध पुरस्कार प्रदान करीत असताना डाॅ. दीक्षित बोलत होते. ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डाॅ. श्रीपाल सबनीस यांनी परिषदेचे उद्घाटन केले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या प्रमुख कार्यवाह डाॅ. सुनीताराजे पवार अध्यक्षस्थानी होत्या; तसेच नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

प्रा. डाॅ. राजा दीक्षित पुढे म्हणाले की, ‘कामगार क्षेत्रातील नारायण मेघाजी लोखंडे, नारायण मल्हार जोशी आणि नारायण गंगाराम सुर्वे या तीन ‘नारायणां’ना मी अभिवादन करतो. नारायण सुर्वे यांचा स्नेह मला लाभला होता!’ प्रा. डाॅ. श्रीपाल सबनीस यांनी, ‘जगात कामगार आणि भांडवलदार यांच्यात संघर्ष असताना येथे एकाच व्यासपीठावर त्यांचा सन्मान होत आहे ही नवलाईची अन् आनंदाची बाब आहे!’ असे गौरवोद्गार काढले.

याप्रसंगी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, मुंबईचे कल्याण आयुक्त रविराज इळवे यांना ‘पद्मश्री नारायण सुर्वे जीवनसाधना सन्मान’ प्रदान करून गौरविण्यात आले. ‘मास्तरांची सावली कृष्णाबाई नारायण सुर्वे सन्मान’ कविवर्य माधव पवार यांच्या सहधर्मचारिणी चारुलता माधव पवार यांना प्रदान करण्यात आला. सुप्रीम कोर्टाकडून फेरीवाल्यांना न्याय मिळवून दिल्याबद्दल महाराष्ट्र कष्टकरी महासंघ या संघटनेचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांना ‘नारायण मेघाजी लोखंडे स्मृती कष्टकरी हितसंवर्धन संघटना पुरस्कार’; तसेच कोलते प्रेसिंग वर्क्सचे माणिकराव ढोकले यांना ‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र उद्योगभूषण पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. याचबरोबर नांदेड येथील श्रीनिवास मस्के (बाईचा दस्तऐवज), इस्लामपूर येथील धर्मवीर पाटील (दिवस कातर होत जाताना), नांदगाव येथील प्रतिभा खैरनार (वंशावळीच्या प्राचीन सरीतून) यांना ‘नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार’ आणि सांगली येथील धनाजी घोरपडे (जामिनावर सुटलेला काळा घोडा), चिंचवड येथील दिनेश भोसले (सूर्य आहे पेरला), जत येथील विनायक कुलकर्णी (ऋतुपर्ण) यांना ‘केशवसुत साहित्य पुरस्कार’; तसेच कुमार खोंद्रे, सुहास घुमरे, महेंद्र खिरोडकर यांना ‘हुतात्मा बाबू गेनू पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले. असंघटित क्षेत्रातील रेखा शिंदे (मोलकरीण), राम बिराजदार (रिक्षाचालक), सुनंदा लोंढे (हातगाडीधारक), रेखा चाबुकस्वार (गटई कामगार), बाळा गराडे (पीठगिरणी कामगार), इघन गिरधर सरदार (सुरक्षारक्षक), मन्सूर पठाण (बांधकाम मजूर), अर्जुन चाटाळे (शवविच्छेदक) या
उपेक्षित कष्टकऱ्यांना सन्मानित करण्यात आले.

पुरुषोत्तम सदाफुले यांनी प्रास्ताविकातून संयोजनामागील आणि पुरस्कार निवडीबाबत भूमिका मांडली; तसेच प्रातिनिधिक सन्मानार्थींशी सुसंवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. काशिनाथ नखाते यांनी असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी व्यापक जनआंदोलन उभारण्याची गरज असल्याचे मत मांडले. चारुलता पवार यांनी साहचर्याविषयी निखळ आनंद व्यक्त केला. साहित्य पुरस्कारार्थींनी कवितांचे सादरीकरण केले. रविराज इळवे यांनी, ‘सन्मान स्वीकारताना मनात अपराधगंड होता; परंतु उपेक्षित कष्टकऱ्यांना सन्मानित झालेले पाहून त्या भावनेची तीव्रता कमी झाली!’ अशा शब्दांत कृतज्ञता व्यक्त केली. डॉ. सुनीताराजे पवार यांनी अध्यक्षीय मनोगतातून, ‘जगातील सर्वोत्तम गोष्टी कामगारांच्या कष्टांतून निर्माण झालेल्या आहेत. अर्धे जग महिलांनी व्यापले असून विषमतेची दरी कमी करून त्यांचा मान राखला जावा!’ अशी अपेक्षा व्यक्त केली.

राजेंद्र वाघ यांनी नारायण सुर्वे यांच्या ‘डोंगरी शेत माझं गं…’ या कवितेच्या केलेल्या गायनाने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. श्रमश्री बाजीराव सातपुते यांनी ‘एकटाच आलो नाही, युगाचीही साथ आहे’ या व्याख्यानातून नारायण मेघाजी लोखंडे आणि नारायण सुर्वे यांचा जीवनपट मांडला. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा काळे लिखित ‘अहिल्याबाई होळकर’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. महेंद्र भारती, मानसी चिटणीस, प्रभाकर वाघोले, जयश्री श्रीखंडे, जयवंत भोसले, प्रा. प्रभाकर दाभाडे, एकनाथ उगले, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केले. प्रा. दिगंबर ढोकले यांनी सूत्रसंचालन केले. अरुण गराडे यांनी आभार मानले.