पिंपरी, दि . 5 ( पीसीबी ) – ‘उन्नत लोकशाहीसाठी छत्रपती शिवाजीमहाराजांच्या महाराष्ट्रात उपेक्षितांचा आवाज ऐकणारे संवेदनशील शासन असावे!’ असे विचार ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरीगाव येथे बुधवार, दिनांक ०५ मार्च २०२५ रोजी व्यक्त केले. पाली – मराठी भाषेचे पहिले शब्दकोशकार बाबा भारती यांच्या जन्मशताब्दीनिमित्त लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठान आयोजित वार्षिक शब्दोत्सव उपक्रमांतर्गत जीवनगौरव व अन्य पुरस्कार प्रदान सोहळ्यात डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. ज्येष्ठ पत्रकार डॉ. विश्वास मोरे अध्यक्षस्थानी होते; तसेच ज्येष्ठ पत्रकार पीतांबर लोहार, कृषिभूषण सुदाम भोरे, लोकशिक्षक बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती यांची व्यासपीठावर आणि शिवाजी चाळक, संतोष गाढवे, आत्माराम हारे आदी मान्यवरांची सभागृहात प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांना लोकशिक्षक बाबा भारती जीवनगौरव सन्मान प्रदान करून गौरविण्यात आले. सन्मानचिन्ह, पुणेरी पगडी, मानपत्र, ‘समग्र बाबा भारती’ हा ग्रंथ आणि शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते. त्याचबरोबर महात्मा फुले महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले (लोकशिक्षक बाबा भारती शिक्षकप्रतिभा पुरस्कार), ॲड. सतीश गोरडे (लोकशिक्षक बाबा भारती कायदेभूषण पुरस्कार), लेखक प्रदीप गांधलीकर (लोकशिक्षक बाबा भारती शब्दप्रतिभा पुरस्कार), कवयित्री शोभा जोशी (लोकशिक्षक बाबा भारती काव्यप्रतिभा पुरस्कार), कवयित्री राधाबाई वाघमारे (लोकशिक्षक बाबा भारती काव्यसाधना पुरस्कार) आणि कवी सागर काकडे (लोकशिक्षक बाबा भारती साहित्य पुरस्कार) प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, ‘समाज आणि संस्कृती दुभंगलेली असल्याने समाजाला एकसंध ठेवणारे सुसंवादी कार्यक्रम नितांत गरजेचे आहेत. या पार्श्वभूमीवर जात, समाज, पंथ या भिंती ओलांडून भिन्न विचारसरणीत सामाजिक एकोपा साधण्याची बाबा भारती प्रतिष्ठानची सर्वसमावेशक भूमिका अन् कार्य महत्त्वाचे आहे!’ सुदाम भोरे यांनी मनोगतातून रयत शिक्षण संस्था, कविवर्य नारायण सुर्वे आणि फ. मुं. शिंदे यांच्याविषयी आठवणींना उजाळा दिला. पीतांबर लोहार यांनी ‘बाप’ या स्वरचित कवितेचे सादरीकरण केले. सत्काराला उत्तर देताना गिरीश प्रभुणे यांनी, ‘पाली भाषेतील धम्म मराठीत आणून बाबा भारती यांनी ज्ञानेश्वरमाउलींच्या तोडीचे कार्य केले आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रेरणेतून मी सामाजिक कार्याला सुरुवात केली. संविधान स्वीकारूनही भारत अजूनही खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक झालेला नाही!’ अशी खंत व्यक्त केली. डॉ. पांडुरंग भोसले यांनी, ‘अध्यापन करीत असतानाच साहित्यसेवा करता आली, याविषयी समाधान वाटते!’ अशी भावना व्यक्त केली; तर ॲड. सतीश गोरडे यांनी, ‘सर्वसामान्यांना कायद्याचे भूषण वाटेल असे काम करण्याची प्रेरणा ‘कायदेभूषण’ पुरस्काराने मिळत राहील!’ अशी कृतज्ञता व्यक्त केली. मुख्य संयोजक पुरुषोत्तम सदाफुले यांनी उर्वरित पुरस्कारार्थींशी सुसंवाद साधून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. डॉ. विश्वास मोरे यांनी अध्यक्षीय मनोगतातून, ‘बाबा भारती प्रतिष्ठानच्या माध्यमातून परंपरेचा वारसा समर्थपणे संक्रमित होत आहे. डॉ. श्रीपाल सबनीस आणि पद्मश्री गिरीश प्रभुणे या साहित्य अन् समाज ऋषींच्या योगदानातून पिंपरी – चिंचवडमध्ये सांस्कृतिक आणि सामाजिक उन्नयन घडत आहे!’ असे गौरवोद्गार काढले.
विद्यार्थिनींच्या हस्ते वृक्षाला जलसिंचन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. महेंद्र भारती यांनी प्रास्ताविकातून वार्षिक शब्दोत्सव या उपक्रमाची माहिती दिली. प्रा. डॉ. कामायनी सुर्वे यांनी मानपत्राचे वाचन केले. अरुण गराडे, प्रभाकर वाघोले, रवींद्र भारती, जयश्री श्रीखंडे, निमिष भारती, जयवंत भोसले, प्रा. प्रभाकर दाभाडे, सविता इंगळे आणि महात्मा फुले महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारीवर्ग यांनी संयोजनात सहकार्य केले. सीमा गांधी यांनी सूत्रसंचालन केले. बाजीराव सातपुते यांनी आभार मानले.