नवी दिल्ली, दि. १६ (पीसीबी) – राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये भाजपाच्या उराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना वाढता पाठिंबा पाहता त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. त्यामुळेच आता भाजपाचे आपला मोर्चा उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीकडे वळवल्याचं चित्र दिसत आहे. आज सायंकाळी पाच वाजता दिल्लीमध्ये होणाऱ्या भाजपाच्या संसदीय समितीच्या बैठकीत उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. विशेष म्हणजे संभाव्य उमेदवारांच्या यादीमध्ये एका मराठी नावाचाही समावेश आहे. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या नावाची जोरदार चर्चा या पदासाठी सुरू आहे.
देशाच्या १६ व्या उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ६ ऑगस्टला होणार आहे. लोकसभा व राज्यसभेच्या एकूण ७८८ खासदारांमधून उपराष्ट्रपतींची निवड होते. राष्ट्रपतीपदाची निवडणूक स्वबळावर जिंकण्याऐवढी भाजपाकडे मते नसल्याने प्रादेशिक पक्षांची मदत घेण्यात येत आहे. पण उपराष्ट्रपतीपदासाठी भाजपाकडे पुरेसे संख्याबळ असल्याने मित्र पक्षांवर अवलंबून राहावे लागणार नाही. त्यामुळेच आजच्या संसदीय समितीच्या बैठकीमध्ये भाजपा उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचं नाव निश्चित करणार असल्याचं मानलं जात आहे.
उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारीच्या शर्यतीत काही दिवसांपूर्वीच राजीनामा दिलेले माजी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांचं नाव आघाडीवर आहे. मात्र त्याचप्रमाणे माजी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या नावाचीही चर्चा उपराष्ट्रपती पदासाठी केली जात असल्याचे समजते. न्यू इंडियन एक्सप्रेसने संभाव्य उपराष्ट्रपती पदाच्या उमेदवारांच्या यादीत प्रभू यांच्या नावाची चर्चा केंद्रीय नेतृत्वाकडून सुरु असल्याचं म्हटलंय.