उपयोगकर्ता शुल्क रद्द करण्याची नाना काटे यांची मागणी

0
334

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कचरा संकलनाच्या नावाखाली शहरवासीयांवर लावलेला उपयोगकर्ता शुल्क रद्द करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सत्ताधारी नेते नाना काटे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.

आपल्या निवेदनात ते म्हणतात, महानगरपालिकेने कचरा संकलनाच्या नावाखाली संपूर्ण शहरातील मिळकतधारकांच्या घरपट्टी पत्रकामध्ये २०१९-२० चा उपयोगकर्ता शुल्क थकबाकी म्हणून ५४० रुपये मिळकतकराच्या बिलात दाखवली आहे. ती वसूल देखील केली जात आहे तसेच दरवर्षीच्या कर मिळकत पत्रिकेमध्ये अश्या प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार आहे. हे सरासर अन्यायकारक असून तत्काळ हा निर्णय रद्द करण्यात यावा. मुळातच अश्या कोणत्याही प्रकारचा कचरा संकलनाचा नावाखाली उपयोगकर्ता शुल्क मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आदी सारख्या महानगरपालिका घेत नाही, मग आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेस अश्या प्रकारचा उपयोगकर्ता शुल्क घेण्याची एवढी घाई का ? शहरातील नागरिक कररूपातून लाखो रुपये कर महानगरपालिकेस भरतात, ते भरून सुद्धा त्यांना महानगरपालिका पुरेश्या मुलभूत सोयी सुविधा देत नाही तसेच प्रशासक राजवटीच्या नावाखाली मनपा विविध कर व शुल्काच्या माध्यमातून शहरातील नागरिकांनची लुट करीत आहे.

उपयोगकर्ता शुल्कचा नावाखाली शहरवासीयांची चाललेली लुट थांबवावी व त्याबाबत काढलेला आदेश त्वरित रद्द करण्यात यावा, अशी विनंती त्यांनी केली आहे.