उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

0
3

राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. मंगळवारी रात्री उशिरा दिल्लीत दाखल झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी आज सकाळी राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची भेट घेत चर्चा केली. त्यानंतर सुनेत्रा पवार यांच्यासह पार्थ पवार, जय पवार, सुनील तटकरे आणि स्वत: प्रफुल्ल पटेल यांनीही आधी पंतप्रधान मोदी आणि नंतर अमित शाह यांची भेट घेतली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी रात्री उशिरा दिल्लीत येऊन भाजप नेतृत्वाची भेट घेऊन नंतर ते मुंबईला परतल्याची माहिती समोर आली होती. या सर्व घडामोडी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूनंतर राज्यातील राजकीय परिस्थिती आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचे विलीनीकरण या दृष्टीने एकत्रितपणे जोडून पाहिल्या जात आहेत. सध्या राज्यसभेच्या खासदारही असलेल्या पवार मध्यंतरी घडलेल्या घडामोडीनंतर प्रथमच दिल्लीत गेल्या आहेत.
सुनेत्रा पवार यांच्यासह त्यांच्या दोन्ही पुत्रांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत जवळपास ४० मिनिटे त्यांच्यासोबत चर्चा केली. तसंच नंतर अमित शाह यांच्यासोबतही अर्धा तास चर्चा केली. यावेळी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. कारण मागील काही दिवसांपासून पवार कुटुंबात बैठकांचा सिलसिला सुरू होता. त्यानंतर आता सुनेत्रा पवार यांनी भाजप नेतृत्वाची भेट घेतल्याने राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत आगामी काही दिवसांत नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.