उपमुख्यमंत्री शिंदेंच्या शब्दाला मान, अजितदादांचा अवमान खासदार श्रीरंग बारणे यांच्यासाठी थेरगावची रचना बदलली

0
60

दि.०६(पीसीबी)-उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पिंपरी चिंचवड शहरातील वाढते वर्चस्व निवडणुकित तापदायक ठरू नये म्हणून आतापासून भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेतून कुरघोड्या सुरू असल्याचे समजले. पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग रचना अंतिम करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खास आपल्या समर्थकांसाठी केलेल्या बहुतांश शिफरशी स्विकारल्या आहेत तर दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी त्यांच्या समर्थकांसाठी सुचविलेले बदल सरळ सरळ डावलण्यात आल्याचे स्पष्ट दिसते.

शिंदेंच्या शिवसेनेचे शहरातील सर्वेसर्वा खासदार श्रीरंग बारणे यांनी आपले चिरंजीव विश्वजीत बारणे यांच्यासाठी थेरगाव प्रभाग क्रमांक २४ मध्ये जे बदल सुचविले होते ते सगळे मान्य करण्यात आले आहेत. या प्रभागातून म्हातोबानगर आणि प्रथम सोसायटी बाजुला काढण्यात आली आहे. आता त्याचा परिणाम या प्रभागातील अनुसूचित जातीचे आरक्षण शेजारच्या वाकड प्रभागकडे सरकणार आहे. यापूर्वी शिवसेनेचे शहर प्रमुख सचिन भोसले हे या जागेवर विजयी झाले होते. आता म्हातोबानगर आणि प्रथम सोसायटी शेजारील वाकड प्रभागाकडे गेल्याने ते आरक्षण तिकडे जाणार आहे. वाकडमध्ये बारणे यांचे पक्षांतर्गत पारंपरीक विरोधाक म्हणून कायम नाव घेतले जायचे त्या राहुल कलाटे यांना त्याचा फटका बसू शकतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या रचनेसाठी विशेष प्रयत्न केल्याचे समजते.